"वर्णावी ती थोरवी एका सदगुरुची । येरा मानवाचे कामा नये ।
सदगुरु समर्थकृपेचा सागर । मनी वारंवार आठवावा ||"
Table Of Contents
कुळवंशपरंपरा
श्री संत एकनाथांच्या मराठवाड्यातील श्री क्षेत्र पैठण जवळच 'मुंगी' नावाचे लहानसे खेडे आहे. येथे काही वर्षापूर्वी वशिष्ट गोत्रीय अहिर शारखेच्या धनगर जमाती मधील पातोंड घराण्याचा रहिवास होता. त्यातीलच एक उर्कडाजी पातोंड आपल्या मेंढपाळ व्यवसाय निमित्ताने फिरत फिरत अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्याच्या जवळीच चार मैल अंतरावरील गोरेगांव या खेड्यात येऊन स्थिरावले, भिन्न भिन्न व्यवसायाच्या विविध समाजातील शेदिडशे उंबरठ्याच्या गावी हे पातोंड घराणे गुण्यागोविंदाने मिळून मिसळून राहू लागले. श्री उकर्डाजीचे सुपुत्र श्री उत्तरांजीच्या पोटी जन्मलेल्या श्री मल्लुजींची मात्र त्यांच्या सदाचरण भगवदनिष्ठा, दानधर्म व परोपकारी वृत्तीमुळे गावा बरोबरच आजूबाजूसही विशेष ख्याती पसरली होती. धर्मपत्नी सौ. सारजाबाईसह परंपरागत मेंढीपालना शिवाय मिळवलेली शेती करीत मिळणारे धन धान्य स्वतःसाधे राहून ईश्वरार्पण बुध्दीने इतरांसाठीच खर्च करण्यात श्री मल्लुजींना धन्यता वाटत असे. दर एकादशीस हरीजागर करुन व्दादशीस पारण्यानिमित्य भंडारा योजून अन्नदान करण्याची त्यांची परिपाठी होती. घराण्यातील शिंदखेडच्या श्री मोरेश्वराची मनोभावे उपासना करीत, नित्यानियमाने चेत्र शुद्ध एकादशीला दरवर्षी गुढी नेण्याची प्रथा त्यांनी अखंडितपाने चालविली होती. त्यांची धर्मनिष्ठा दानशूरता ऐकून त्यावेळचे इन्दोरचे राजे होळकरही स्तिमित झाले होते. श्री मल्लूजींनी चारीधामसह अनेक तिर्थयात्राही त्याकाळी मोठया भक्तिभावाने पार पाडल्या होत्या. पण लग्न होऊन बरेच वर्षे झाली तरी पोटी संतान नसल्याने दोघे पतीपत्नी अंतरी थोडे दुखीच रहात असत. कालांतराने श्री क्षेत्र शिंदखेडी मिळालेल्या देवी संकेता नुसार कार्तिक एकादशी सोमवार ६ डिसेंबर १९०९ रोजी त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. श्री खंडेरायाच्या कृपाप्रसादाने प्राप्त झालेल्या या मुलाचे नाव ठेवले गेले "खंडुजी", मोठया आनंदाने खंडुजीला श्री खंडोबाचे पायी घालण्यासाठी श्री मल्लूजी व सारजा श्री क्षेत्र जेजूरी येथे गेले. तेथील दर्शनानंतर वाटेत त्यांची चुकामूक होऊन शोधाशोध करुनही तीन दिवस त्यांचा पत्ता लागीना तिसऱ्या दिवशी तेथील एका मुरळीनेच या खंडूजीस आईबापाकडे सुखरुप सूपूर्त करीत सांगितले, “हा मुलगा फार भाग्यवान असून देवच याचे पोटी जन्म घेईल'' या खंडूजीनंतर शंकर नावाचा दुसरा मुलगाही श्री मल्लूजीला लाभला,
भगवद्भभक्त खंडूनाना:
आपल्या पित्याप्रमाणेच श्रीखंडूजी उपारख्य नाना फारच धार्मिक वृत्तीचे होते. घरातील व्यवसाय सांभाळून उर्वरीत वेळ भजनपूजनामध्येच ते व्यतीत करीत, श्रीसंत गाडगेबाबा यांचेवर त्यांचे निरतिशय प्रेमच जडले होते. ह्या परंपरेतील श्री माधवराव वंजारी यांचे किर्तनातून ते आवडीने साथ करीत असत. वडीलांपासुन चालत आलेले एकादशीचा हरीजागर व व्दादशीचे अन्नदान कार्य त्यांनी पुढे चालविले होते. दररोज भजनानंतर मारुतीच्या पारावर भक्तीचे वरदान मागण्यासाठी त्यांची आर्जव सुरु असत. वयाच्या सतराव्या वर्षी दर्यापुर जवळील गायवाडीच्या उकर्डा पातुर्डेची कन्या "मंजुळा'' बरोबर त्यांचा विवाह लावला गेला. परंतु वर्षभरातच ती केलाशवसी झाल्याने एकोणविसाव्या वर्षी अकोला जिल्ह्यातील बाभुळगांव (जहागीर) येथील श्री हरिसिंग कळंब यांची सुकन्या 'गोपिकाबाई बरोबर त्यांचा दुसरा विवाह संपन्न झाला. सासरी आल्यावर गोपिकाबाईंना प्रथम पत्नीचे "मंजुळा" हेच नाव दिले गेले. नावाप्रमाणेच त्याही मृदु मधुर अंत:करणाने खंडुजीच्या धर्मशील संसाराची एकनिष्ठेने सुंदर साथ करु लागल्या. खंडुजीची वृत्ती भक्ती मार्गी जास्त झुकु लागुन घर कामा पेक्षा परोपकारातच अधिक गुंतून राही. या दुसऱ्या विवाहा नंतर वर्षभराच्या अंतरानेच खंडुजीचे पिता श्री मल्लुजी स्वर्गवासी झाले. त्यामुळे खंडुजिचे चित्त अधिकच भजनशिल बनले.
सदगुरु श्री पुंडलिक देवांचे अवतरण
श्री खंडूजी व सौ. मंजुळेचा धर्मपरायण संसार सुरु असतानाच त्यांना प्रथम अपत्याची चाहूल लागून त्यांची मने सुखावली. पोटातील गर्भ वाढत जाईल तशी सौ. मंजुळाबाई नाही काही आगळीच प्रचिती येऊ लागली. आपल्या देहाचा विसर पडून सर्वत्र ईश्वर भरून राहिला आहे, असे त्यांना वारंवार जाणवू लागले. कोणीही दुःखी कष्टी - अडलेला, नडलेला पाहून त्यांचे मन अगदी कळवळून जाई अशा चित्रविचित्र अनुभुती घेत असतांना फाल्गुनमास सरुन नववर्षाचा चैत्रमास उजाडला. वसंताच्या आगमनाने झाडांना हिरवी पाने फुटू लागली. सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण भारुन गेले. यावेळीच गावातील हौशी मंडळीनी एक नाटक बसवून सादर करण्याचे ठरविले. दि. १० एप्रिल १९३२ रोजी रात्री आठवाजता हे नियोजित नाटक सुरु झाले, त्याचे नाव होते 'भक्त पुंडलीक' या नाटका मध्ये खुद श्री खंडूनाना, त्यांचे बंधू श्री शंकरराव या शिवाय श्री अंगदराव सानप, बाळकृष्ण बळीराम पाटील, लक्ष्मण जयराम कुंभार, नथ्थु शंकर मोरे, राजाराम आकाराम मोरे, रामचंद्र महादु मोरे, रघुनाथ शामराव डोईफोडे, या सारख्या अनेकांचा सहभाग होता.हे नाटक पहाण्यासाठी अर्थातच सारा गोरेगांव लोटला होता. तरीही सौ. मंजुळाबाई मात्र प्रसववेदनेमुळे सासूबाई गं.भा. सारजाबाईसह घरीच राहील्या होत्या. या नाटकाच्या मध्यंतरी अगदी अचानकपणे एक दिव्यदेहधारी दाढीजटावाला भगवीवस्त्रे ल्यालेला साधु श्री खंडूनाना समोर प्रगट होऊन म्हणाला , " अरे दिसण्यात जणू मीच असा सुंदर आरसारुपी पुत्र तुला दिला आहे. सांभाळ कर". एवढेच वाक्य बोलून तो साधू बघता बघताच अंतर्धान पावला. इकडे अगदी त्याचवेळी म्हणजे रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी रोहीणी नक्षत्रावर शके अठराशे चौपन्न रोजी चैत्र शुध्द पंचमीच्या रविवारी सौ. मंजुळा मातेला प्रथम पुत्ररत्न प्राप्त झाले. साधूच्या संकेतानुसार लगबगीने घरी आलेल्या जनानांना पण भुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या दर्शनाने अपार हर्ष झाला. त्याचदरम्यान सौ. मंजुळाबाईच्या माहेरी त्यांच्या मातोश्री रायजाबाईना दिव्य प्रकाशाचा झोत दिसून, त्या आनंदमय भावस्थितीतच त्यांचे मुखातुन , "आपल्या गोपिकेला पुत्र झाला. हिरे माणिक मोती भरारे" असे उदगार बाहेर पडले. त्यावेळी सर्वांनाच त्याचे आश्चर्य वाटून काही कळेनासे झाले पण दुसर्यादिवशी गोरेगांवची पुत्रजन्माची वार्ता कळल्यावर वरील अनाकलनीय बाबीचा सहजच उलगडा झाला, पुढे यथाकाल सर्व सुवासिनिन्नि जमुन बारसे केले व मुलाचे नाव ठेविले" पुंडलिक " कारण, याच नाटकाच्या समयी मुलाचा जन्म झाल्याने तेच नाव ठेवणे सर्वानाच अगदी यथायोग्य वाटले.
श्री पुंडलिक देवांचे बालपण:
अगदी
जन्मत:च
रडणे
ही गोष्टच
बाळ
पुंडलिकाला
माहिती
नव्हती.
अगदी
बालवयातही
न रडता
शांतचित्ताने,
कधी
मधी डोळ्याची उघड झाप करीत पाळण्यामध्ये पहुडलेली बाळ पुंडलिकाची मुर्ती सर्वानच्या कौतुकाचा विषय बनून जाई, थोडे मोठे झाल्यावर रांगू लागला, हळू हळू आधार घेत उठून हिंडु - फिरु लागला पण रडण्याचा हुंदका कधीच कोणी ऐकला नाही. आपलेच मनगट चोखत स्वतःच्याच तंद्रीत मनमागेल तसे हुंदडत रहाणान्या या मुलास कितीदाही संपूर्ण अंगभर कपडे घालण्याचा प्रयत्न केला तरी थोड्याच वेळात संपूर्ण फाडुन टाकुन पुर्णतः दिगंबर रहाण्याकडेच त्याचा कल दिसून येई. वयाची सहावर्षे पूर्ण होऊन सातवे वर्ष लागले तरी मुखातून कोणतेही अक्षर काढीनात. त्यामुळे मातापिता या मुलाचे दुःखकरू लागले त्याच दरम्यान अमरावती जिल्यातील दर्यापुर मधील पिंपळोंदचे महान अवलिया सत्पुरुष योगिराज श्री परशरामबाबा दमणीत बसून आपल्या मर्जीने सहजच गोरेगांवी येऊन ठेपले. श्री परशरामबाबा है भव्यदिव्य शरीरयष्टीचे दिगंबर महापुरुष आपल्या सामर्थ्याने मृत गाईला व कुत्र्याला जिवंत केल्याने त्याभागात फारच प्रसिद्ध होते. गोरेगांवी येताच स्वैरसंचार करणाऱ्या बाळ पुंडलिकाकडे नजर जाताच हर्षातिरेकाने आनंदून जाऊन ते 'मन्या, मन्या' म्हणुन त्यास आपल्याकडे प्रेमाने बोलवू लागले. बाळ पुंडलिक जवळ येताच हातात हात घालून दोघांचा आगळा वेगळा मुकसंवाद रंगला त्या प्रसंगीच हास्याची कळी उमललेल्या बाळ पुंडलिकाचे मुखातून 'गोविंद राधे गोविंद' हे प्रथम शब्द बाहेर पडले.
श्री पुंडलिक देवांचे अजब बालक्रिडा:
एकदा बाळ पुंडलिक खेळत असतांना अस्सल फणाधारी नाग त्याचे दृष्टीस पडला. धावत जाऊन त्यास मुखाने चोखत आणून बाळ पुंडलिकाने त्याच्या शरीराचीच त्यास गाठ देऊन त्याच्या माथ्यावर हाताने चापट्या मारीत मुखाने गोविंद राधे गोविंद' असे भजन सुरू केले. नंतर त्यानागाचे मुटकुळे जमीनीवर ठेवून त्या भोवताली ताल धरुन नृत्य करीत ' गोविंद राधे गोविंद' चा नामघोष करीत ते तल्लीन झाले. तो नागही स्वस्थपणे डोलत राहिला. इतक्यात तिकडून जाणाऱ्या खंडुनानांनी ते पाहून घाबरुन त्यांनी लोकांना बोलावताच काही लोकांनी त्या नागास ठार मारले. तेव्हा त्या मृतनागास मुखी चोकत , " साप मरणाच्या भीतीतून सुटला हो" असे म्हणत बाळ पुंडलिक घरी आले. त्यांचे मुखातील मृत नाग पाहून घाबरून जाऊन माता मंजुळेने त्याच्या हातातून तो काढून घेऊन दूर नेवून टाकला.
एकदा असेच खेळण्यात गुंग असलेले बाळ पुंडलिक पाहून खंडूनाना दार बाहेरून लावून निघून गेले. पण इकडे त्या दारा जवळच खेळण्यात गुंग असलेल्या बाळ पुंडलिकाची हाताची सर्व बोटे दाराच्या फटीत सापडून काळी निळी होऊन गेली. बर्याच वेळाने खंडुनाना घरी येताच पहातात तो वारात अडकून काळी निळी पडलेली आपली पार चपटकी झालेली बोटे शांतपणे काडुन घेत बाळ पुंडलिक इतरत्र धावू लागला. पण वेदनेचा इतकाही लवलेश नाही, रडणे-औरडणे तर दुरच राहिलें.
दिवसभर गावातील काटेपूर्णा नदीच्या तीरावर, आजू बाजूच्या शेतीवडीतून, कधी कोणाच्या घरी, कधी कोणाच्या अंगणात बाळ पुंडलिक येथेच्छ हिंडत राही, अंगावर कपडा त्याला बिल्कुल आवड्त नसे. एकदा खंडूनानानी बळजबरीने त्यास शाळेत घालण्याचा चंग बांधला. पूर्ण ज्ञानि असलेल्या या बालकास शाळेची जरूरी तरी काय ? यास कोणी शिकवावे आणि काय शिकवावे ? हाही मोठा प्रश्न होता. शाळेत गेल्यावर बाळ पुंडलिक गुरु्जीच्याच खुर्चिवर बसून गुरुजींच्या दृष्टीस दृष्टी भिडवून, " गीता काय म्हणे ? कृष्ण काय म्हणे ? अर्जुन काय म्हणे ? मनुष्य जन्म कशा करीता ? असे प्रश्न विचारुन त्यास भंभावून सोडीत.गुरुजींना पण या मुलास कोणीच शिकवण्याची जरूरी नसल्याचे त्यानी येऊन ते त्याचा अधिकार ओळखून शांतपणे त्यांचे मुखावलोकन करत उभे रहात. खंडूनानांना हे कळताच त्यांचे मुलाला शिकवण्याचे स्वप्न येथेच संपून गेले.
बाळ पुंडलिकाचे सदैव स्वैर हिंडणे, नदी मध्ये तासन्तास पोहणे, कोणाकडेही केव्हाही जाणे येणे कोणच्याही घरातील वस्तू फेकणे, मोडतोड करणे हे सर्व पाहून बाळ पुंडलिकाला घरी कोडुन ठेवणे खंडूनानांना क्रमप्राप्त झाले पण दिवसा कोंडले तरी ते संपूर्ण रात्रभर एकटेच हिंडून गांव पालथा घालीत. रात्री अपरात्री नदीवर, स्मशानात प्रेत जळताना हिंडतांना बाळ पुंडलिकांना कोणतेही भय वाटत नसे. एकंदरीत हे सर्व प्रकार पाहून श्री खंडूजीनाना व मंजुळामातेला मात्र आपला हा मुलगा शहाणा की वेडा हेच समजत नसे. त्यांच्या विचित्र बाललीलांनी त्यांचे डोके सदैव चक्रावून जात असे.
श्री पुंडलिक देवांचे आदीभक्त उरकडभाऊ
या गोरेगांवातच उरकडभाऊ सरदार नावंचे एक सज्जन गृहस्थ आपला पिढीजात हेडेपणाचा म्हणजे गुरेढोरे विक्रीचा धंदा करीत सुखाने रहात होते. एकदा मुर्तिजापूरला खरेदी केलेली घोडी अकोल्याच्या बाजारात विकण्यासाठी ते चालले असताना वाटेत एका संताचे दर्शन त्यांना झाले. ते त्यास विनम्रतेने वंदन करू लागताच ते संत म्हणाले. "अरे तुया गावांतच देव नांदतो आहे. त्याची सेवा कर." तेव्हा,
"मी देवास कसे ओळखावे ?असा प्रश्न विचारताच तो संत बोलला, "अरे सुर्योदयापूर्वी तुझ्यादारी येऊन जो कोणी हार व फुटाणे मागेल तो देव समज" तेथून गोरेगाती परतल्यावर रात्री झोपून पहाटे उरकडभाऊ उठताच दारावर थाप पडली. त्यांनी दार उघडताच बाळ पुंडलिक त्यांचा कडे पहता म्हणु लागले," आम्हाला हार फुटाणे द्याना भाऊ, तो साधूकाय म्हणे ?"
हे ऐकताच हार फुटाणे बाळ पुंडलिकांच्या हाती देत उरकभाऊंनी त्याचे समोर लोटांगण घातले. अगदी त्याच क्षणापासून ते अगदी पूर्ण निश्चयाने देव समजूनच बाळ पुंडलिकाची यथासांग पुजा करीत. सर्व गावकरी इतकेच काय खंडूनाना पण त्यांची थट्टा करुन त्यांना या पासून परावृत्त करण्याचा प्रयन्त करीत पण उरकड भाऊ मात्र यत्किंचितही विचलीत न होता कोठेही बाळ पुंडलिक दिसताच, त्याचे ओंगळवाणे घाणीने भरलेले शरीर न पहाता त्यास आपल्या पाठकुळीस घेऊन घरी येत व त्याची यथाशक्य शुश्रुषा करीत. त्यांनी त्याच्याकरीता घरी एक खास बंगळीच स्थापन केली होती. त्यावर बसवून त्याची पूजाअर्चाकरताना त्यांना परमानंद होई.
श्री अंगदराव सानप हे ही गावातील सत्शील गृहस्थ बऱ्याच वर्षापासून श्री गोपालकृष्णाची पूजा करुन गोवर्धन उत्सव मोठया प्रमाणात साजरा करीत असत. त्यांच्या हवेली जवळच दुर्गादेवीच्या निशाणाजवळ बाळ पुंडलिक बर्याचवेळा येऊन तासन्तास बसे. अंगदभाऊ कडेही मर्जीनुरुप जात असे. तेही त्यास गोपालकृष्ण समजूनच मनोभावे त्यास वंदन करुन खाऊपिऊ घालत असत. अगदी पुढेही मोठे झाल्यावर श्रीपुंडलिक बाबांच्या तोंडी उरकडभाऊ व अंगदरावांचे नाव कायम निघत असे.
श्री पुंडलिक देवांला गोविंदसाधूने कुरणखेडी आणले:
कुरणखेडचे सोनार समाजातील '
गोविंदसाधू' साधै भोळे कृष्णभक्त होते. त्यांचा श्री रवंडूनानाशी निकटच स्नेह होता. ते मनोमन बाळ पुंडलिकालाही कृष्णस्वरूप मानून त्याच्या सहवासात रहाण्यासाठी तळमळत असत. एकदा ते गोरेगावी आले असताना बाळ पुंडलिक मोठ्या प्रेमभराने त्यांच्या गळ्यात पडत म्हणू लागले," आम्ही तुमच्या गावी येतो ना बुवा, तुमचा धावा पोचला ना." हे उद्गार ऐकुन आनंदून जाऊन श्री गोविंदसाधूनी बाळपुंडलिकाला कुरणखेडी नेण्याची श्री खंडुनानांना परवानगी मागितली. तेव्हा आपल्या अल्लड पोराला कसे पाठवावे या विचारात असणाऱ्या खंडूनानांना श्री गोविंदसाधूनी तुमचा मुलगा प्रत्यक्षात देव असल्याचे सांगून तुम्ही त्याची अजिबात काळजी करु नये, मी त्यांची सर्व देखरेख ठेवतो असा विश्वास दिला, मोठ्या आनंदाने ते बाळ पुंडलिक देवाला घेऊन आपल्या गावी पोहोचले. श्री गोविंदसाधूनी केलेले आजपर्यंतचे वर्णन व समक्षच समोर असलेले बाल पुंडलिकदेवपाहून सारेगावकरी पण खूश होऊन मनोभावे त्यांचे भजन पूजन करण्यात रमून गेले.
एके दिवशी या गावातील श्री यशवंत माळी यांचा अवघा पाच वर्षे वयाचा बालक अचानक मृत्यूमुखी पडला.त्या बालकाच्या प्रेताजवळ बसून माता पित्यासह इतर सोबती जनही वियोगाने शोक करीत बसले होते. नेमके त्याचवेळी श्री पुंडलिकदेवाची स्वारी फिरत फिरत त्याठिकाणी पोचली. त्यांना पहाताच मातापित्यानी अधिक जोरात हंबरडा फोडून' मुलाला जीवदान द्यावे म्हणून अंत:करणापासून प्रार्थना सुरू केली श्री पुंडलिकदेवांच्या मनी काय आले न कळे ,
ते त्वरेने उठुन या मृतबालकाजवळ जाऊन त्याच्या मुखाला आपले मुख लावीत ' आंबा घे, आंबा घे,
असे म्हणू लागले. काही मिनिटे असे चालले आणि त्या मृत बालकाच्या देहात पुनःश्च नवचैतन्य प्रगटले तो बाळ जिवंत झालेला पाहाताच मातापित्यासह उपस्थित गावकरी श्रीपुंडलिकदेवाच अतकर्य महिमा पाहून परत परत त्यांचे चरणी लोटांगण घालू लागले. त्यादिवशीच रात्री गांवकरी एकत्रित बसून भक्तिभावाने भजने म्हणू लागले. त्यासमयी तेथे लावलेल्या दिव्यातील तेल संपून दिवा विझू लागताच श्री पुंडलिक देवांनी उठून जवळचे थोडे पाणी त्यात टाकून दिले. आश्चर्य म्हणजे तो दिवा तेव्हापासून तसाच पूर्ववत जळत राहून बरोबर सातव्यादिवशी विझला, नेमके त्याचक्षणी तो माळ्याचा जिवंत झालेला मुलगाही अचानक मृत्यु पावला. त्यावेळी दर्शनासाठी आलेल्या शोकाकुल मात्यापित्याला धीर देत, जो जन्मला तो एकदा मरणारच, त्याचा वृथा शोक करू नये असा बोध देवून दुसरा कुलदीपक पुत्र होईल असे आशिवर्चन देऊन त्यांचे श्री पुंडलिकदेवाने सांत्वन केले. यावेळी श्री पुंडलिकदेवांचे वय साधारणत-९ -१० वर्षाचे होते.
श्री पुंडलिक देवांचे कुटासा गांव प्रयाण:
कुरणखेडहून परतल्यावर काही काळ गोरेगांवी राहून वयाच्या ११ व्यावर्षी श्री पुंडलिकदेव आपल्या भक्तासह अकोला जिल्ह्यातील अकोट जवळील कुटासा या गावी गेले. तेथे त्यांची आत्या सखुबाई कवठकार रहात असे. पण अर्थातच जन्मत:च जे सर्वत्र ब्रम्हमय जगताचा पूर्ण अनुभव घेत होते. त्या पुंडलिकदेवांना कोणतीही व्यवहारी नातिगोती बदनात पाहू शकता नाहती, ते केव्हाही कोठेही असोत त्यांची ब्रम्हनिष्ठा एकसारखीच असे. या कुटासा गावी एक सुंदरसे तळे निसर्गत:च तयार झाले होते. श्री पुंडलिकदेव बहुधा सदानकदा याच तळ्या मध्ये आकन्ठ जालविहार करित, स्वतःच स्वत:शी खेळत राहत असत. एकेकवेळी खोल पाण्यात बुढी घेऊन ते तास चे तास त्या पाण्याखालीच स्थिर बसत असत. लहरीनुसार सारा गावभर फेरफटका मारीत, भुक लागल्यास कोणाकडेही भाकर भाजी मागून घेउन खत, व अंगावर घातलेली वस्त्रे टराटरा फाडून फेकून देऊन ते मुक्तसंचार करीत राहत.
एकादा तेथील एका किराणा दुकानदाराच्या दुकानात घुसून श्री पुंडलिकदेवांनी त्यांच्या वस्तूची बरीच मोडतोड फेका फेक करून टाकली. तेव्हा चिडून जाऊन रागाने त्याने श्री पुंडलिकदेवाला पकडून एका मिरचीच्या पोत्यात गच्च बादून रात्रभर ठेवून दिले. दुसऱ्या दिवशी पोते उघडून पाहातो तर नेहमी प्रमाणेच आपल्याच तंद्रीत हास्यमुखाने ‘जय गोपाळ' म्हणत बाहेर पडून जणू काही झालेच नाही याच भावनेने अगदी सहजपणेच ते पूर्ववत फिरु लागले. त्यांची एकंदर दिनचर्या पाहून गांवकरी गोंधळात पडत.त्यांचे विषयी मनी देवत्व जाणवू लागे. त्यावेळी बाह्यकृती मुळे साशन्कता निर्माण होऊन मनाची द्विधावस्था होत असे या मुळेच काही विकृतव्यक्तींनी त्यांच्या जान्घेत बिब्बा ठेचुन लावला. तेव्हा बर्याच खोल जखमातून रक्तवहात असतानाही त्यावर कोनतेही औषधोपचार करुन न घेता ते आपल्याच मस्तीत दंग राहून क्रिडा करीत असत.
«


