भक्त राधाकिसन बुवांची वचनपूर्ती
मुर्तिजापुरच्या या दत्तजयंती उत्सवातच खरबचे काही भक्त सहजच तेथील मंदिरात आल्यावर श्री पुंडलिक बाबांचे अनपेक्षीत दर्शन घडून ते मनोमन सुखावले. त्यांनी दर्शन घेताच श्रीबाबांनी त्यांस श्री राधाकिसनबुवांना त्वरीत आपलेकडे पाठवून देण्याविषयी सांगितले. ती खरबची मंडळी दर्शन घेऊन गांवी येताच श्री राधाकिसनबुवांना श्री बाबांचा निरोप देऊ लागताच श्री बाबांना आपण येथे असल्याचे कसे कळले म्हणुन ते आश्चर्यचकित झाले. मग गावात श्री शांताराम पाटील यांना सांगून त्यांच्याच बंडीने जमल्यास दुसऱ्यादिवशी कार्यक्रमास श्री बाबांना येथेच घेऊन येण्याच्या उद्देशाने ते मुर्तिजापुरी पोचले.
Table Of Contents
पूज्य श्रीबाबांचे दर्शन घेऊन ते श्री विठ्ठलराव जमादार यांचे स्नेही श्रीनारायणराव आंबेकर यांना श्रीबाबांना खरबला घेवून जाण्याविषयी विचारु लागले. तेव्हा त्यांनी श्री विठ्ठलराव यांच्या कानी घालताच, गावकऱ्यांना न सांगता परस्परच आपल्या भरवशावर पाठविलेल्या श्रीबाबांना दुसऱ्यागांवी जाऊ देणे योग्य नसल्याचे सांगितले. तेव्हा श्री आंबेकर म्हणाले,*श्री बाबा साक्षात देवच आहेत* तर आपण आता त्यांच्या मर्जीनेच वागणे बरोबर होईल. आपण आता त्यांना गोरेगांवी पोहचण्यासाठी आपली बंडी जुंपू व श्री राधाकिसनबुवा त्यांना खरबला नेण्यासाठी त्यांची बंडी जुंपू देत. श्री बाबा मग त्यांच्या मर्जीने ज्या बंडीत बसतील त्याने त्यांना आपल्या बरोबर घेऊन जावे. त्यांचा सल्ला सर्वाना पसंत पडून दोन्ही बंड्या तयार करण्यात येऊन श्री बाबांना त्यांच्या इच्छेने बसण्यासाठी प्रार्थना केली गेली. श्रीबाबा प्रथम गोरेगावी नेणाऱ्या श्री जमादारांच्या बंडीत बसून थोडा वेळ घुटमळून श्री राधाकिसन बुवांच्या बडीत चढून चला म्हणू लागले. तेव्हा त्यांची मर्जी जाणून मोठ्या आनंदाने त्यांना श्री राधाकिसनबुवा खरबला घेऊन आले.
इकडे हे वृत्त गोरेगांवी भक्तांना समजताच श्री बाबांच्या व्यवस्थेसाठी काही जणांनी स्व बुध्दीने स्थापन केलेल्या पंचकमेटीतील श्री माणिकराव पाटील रागाने खरब येथे पोहोचले. श्री बाबाना परस्परच येथे आणल्या बद्दल ते श्रीराधाकिसनबुवांना दुषण देऊन निर्भत्सनापूर्वक बोलू लागले. श्रीराधाकिसनबुवांनी प्रामाणिकपणे जे घडले ते सर्व त्यांच्या कानी घालुन त्यांना शांत केले.
येथे पंचकमेटीचा श्री राधाकिसनबुवां वरील राग असण्याचे पाठीमागे जो इतिहास घडला तो सांगणे जरुरीचे आहे. श्री राधाकिसन बुवा किर्तन करीत गावोगावी फिरत असले तरीही नाशीक जिल्हातील सिन्नर जवळच्या *दातळी* ह्या गांवातील भोळ्या भाबड्या सरळ हृदयी ग्रामस्थांवर त्यांचा विशेष जीव असे. तेथील लोकही श्री राधाकिसन बुवाना मनोमनी आदराने अत्यंत प्रितिने वागवित असत. श्री राधाकिसनबुवांनी यापुर्वीच या गांवी पुज्य *संत श्री गाडगेबाबा* व *राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना* आग्रहाने नेले होते. तसेच ते म्हणत असत की मी यागांवी थोर संताना घेऊन आलो आहेच. पण पुढे जर मला देव भेटला तर मी त्यालाही येथे जरुर घेऊन येईल, योगायोगाने पुढे परमपुज्यभगवान *परमहंस श्री पुंडलिक बाबांची* दर्शन भेट घडल्यावर त्यांनी तेथील किर्तनातून त्यांचे महात्म्य वर्णन करुन सांगीतले . त्याच दरम्यान तेथील श्री सखाराम अव्हाळ याने श्री राधाकिसन बुवांना घरी बोलावून घेवून नुकत्याच मुंबईवरुन अत्यवस्थ स्थितीत आणलेल्या आपल्या चि. रामनाथ या मुलाविषयी सांगीतले. मुंबईचे सुप्रसिध्द डॉ. सिरोडकर यांनी मुलगा जगण्याची आशा नसल्याचे सांगून व्यर्थ औषधोपचार करण्यापेक्षा घरी परत जाण्याचा सल्ला दिल्यानुसार ते गावी परतल्याचे सांगुन काही दैवी उपाय सुचविण्या बाबत ते विनंती करू लागले. त्या प्रसंगी संत हृदयी सद्भक्त श्री राधाकिसन बुवांचे अंतःकरण द्रवले. त्यांनी घरच्याना मनोभावे *पुंडलिक देवांचे* स्मरण करण्यास सागुन स्वतः पुज्य *श्री बाबांना* मनोमन आळवून मुलाच्या आरोग्या विषयी प्रार्थना करीत तेथेच स्वच्छ केलेल्या जागेवर कापुर उदबत्ती लावून *श्री बाबांच्या* नामोच्चाराने पवित्र जलाचे तिर्थ तयार केले. ते मग श्रध्देने मुलास पाजवून उदबतीचा अंगारा मस्तकी लावला व सात दिवसपर्यंत पुढे अशाच प्रकारे निष्ठेने करण्यास सांगून ते आपल्या किर्तनाच्या नियोजीत कार्यक्रमासाठी *तारुखेर्ड्डा* गावी गेले. इकडे निष्ठेने केलेल्या या भक्तीच्या उपचाराने चि. रामनाथची प्रकृती उत्तम होऊन सुधारु लागली. डॉ. सिरोडकर यांनीही घडलेल्या या बदला मुळे फारच आश्चर्य व्यक्त केले. मग परत श्री राधाकिसनबुवा गांवी येताच त्यांनाही त्या मुलाची ठणठणीत प्रकृती पाहुन आनंद झाला. त्यावेळी सर्वच गावकऱ्यांनी श्री राधाकिसन बुवांना त्यांनी पुर्वी काढलेल्या उद्गाराची आठवण करुन देत *श्री भगवतस्वरूपी श्री पुंडलिकबाबांना 'दातळी'* येथे घेऊन येण्याची कळकळीची विनंती केली. त्यांनीही ती मान्य करुन ते गोरेगांवी येऊन तेथील पंचकमेटीसमोर याबाबत सांगून पूज्य श्री बाबांना दातळी नेण्याविषयी विचारू लागले. पण श्री बाबांचे अवलिया वागणे, क्षणभर स्थिर नसणे, केव्हा काय करतील बोलतील याचा भरवसा नसल्याने इतक्या दूरवर परक्याठीकाणी घेऊन जाण्यासाठी ते परवानगी देईनात. श्रीराधाकिसनबुवांच्या मनातील सद्भाव व तेथील ग्रामस्थांचा अंतरीचा प्रेमभाव जाणून श्री बाबा मात्र तेव्हाच श्री राधाकिसनबुवांना म्हणाले होते, *आम्ही येऊ बुवा, विश्वास ठेवा बूवा, सबूरी पाहिजे* श्री बाबांचे हे वाक्य ऐकुन श्री राधाकिसनबुवांचे दातळीकरांवरील प्रेम माहिती असल्यामुळे ते श्री बाबांना नकळत तिकडे घेऊन जातील अशी भिती असल्याने पंचकमेटीचा श्रीराधाकिसनबुवा वर निष्कारण राग निर्माण झाला होता. आतातर श्री बाबांना ते परस्पर खरबला घेऊन आल्याने त्यांचा सशंय दृढावला होता.
श्री राधाकिसनबुवांच्या भेटीनंतर झालेल्या खुलाशामुळे पंचकमेटीचे श्री माणिकराव पाटील थोडे स्वस्थ झाले. मग श्री बाबांचे दर्शन घेतल्यावर श्री बाबांनी त्यांना हाताला धरुन त्यादिवशी सबंध गावभर, उसंत न घेता आपल्या बरोबर हिंडवले . त्यामुळे थकून ते निश्चित पणे झोपले. याचवेळी श्री बाबांनी श्री राधाकिसनबुवांना दातळीकरांना दिलेल्या वचनपुतींची हीच योग्य वेळ असल्याचे सुचवून त्या दिशेने प्रवासाला निघण्याची घाई सुरु केली. त्यांच्याच शब्दा नुसार श्री राधाकिसनबुवा काही सहकाऱ्यासोबत श्री बाबांना घेऊन बंडीने रात्री ९ च्या सुमारास मुर्तिजापूर रेल्वेस्टेशन कडे निघाले. रस्त्याने ते श्रीबाबांना परस्पर न सांगताच दातळीला घेऊन गेल्याबद्दल पचकमेटी व खंडूनाना आपल्यावर कोर्ट कचेरी करुन आपल्याला तुरुगांत टाकतील अशी भिती व्यक्त करु लागले, तेव्हा श्रीबाबा बोलले. *जेलाला गांधी नेहरु भ्याले काय बुवा"?* तेव्हा मतीतार्थ ध्यांनी घेवून श्री राधाकिसन बुवाशांत राहीले.
भक्तोध्दारसाठी दातळीच्या दिशेने परिभ्रमण
पुज्य श्री बाबांच्या आज्ञेने श्री राधाकिसनबुवा, श्री शांतराम भारंबे, मारोती पोहकार, धोंडु पाटील, किसन ठाकरे, अण्णाजी पंधेकर, यांच्या समवेत मुर्तिजापुरला येऊन पोहचले. आता येथुन पुढे रेल्वेने जाण्यासाठी तिकिट काढण्या करीता पैसे पाहु लागताच श्री राधाकिसनबुवां जवळ असलेल्या अवघ्या साडेतिन रुपया व्यतिरीक्त कोणाकडेही काहीच पैसे नसल्याचे समजले. तेव्हा संचित मुद्रेने बाबाकडे श्री राधाकिसन बुवा पाहु जाताच, *विश्वास ठेवाना बुवा, आम्ही सोय करतोना बुवा* असे अभय वचन त्यांनी दिले.
इतक्यातच श्री गोविंद खराटे तेथे येऊन पोहचले व त्याने आणलेले एकशे तिस रुपये भक्तीभावनेने त्यांने श्री बाबांच्या चरणी समर्पून पूजा केली. आपल्याला नोकरी लागल्यास येणारा पहीला पगार श्री बाबांच्या चरणी समर्पण करण्याचा त्याचा मनोदय होता त्यानुसार मिळालेल्या नोकरीचा हा पहीला पगार श्री बाबांच्या चरणी समर्पण करण्यासाठी ते गोरेगावीच निघाले होते, पण योगायोगाने श्री बाबा इथे असल्याचे समजल्याने ते तडक येथेच येऊन पोहचले. श्री बाबांच्या या विचित्र लिलेने थक्क होत श्री राधाकिसनबुवांनी त्या पैशातुन मग रेल्वेची तिकिटे काढून ते रेल्वेने दातळीच्या दिशेने प्रवास करु लागले. मध्येच निफाड स्टेशन येताच नाशीकची थेटपर्यंतची तिकिटे काढली असुनहीं श्री बाबांनी तेथे उतरण्याचा लकडा लावला. परत परत विनंती करुनही त्यांनी तेथेच उतरण्यास सर्वाना भाग पडले.
जंगल मे मंगल:
निफाड स्टेशनवरुन निफाड गांव एकदीड मैल दुर असावे. भक्तांसह चाललेले श्री बाबा थोडे चालून जाऊन गाव येण्यापुर्वीच मध्येच लागलेल्या निर्जन आमराईत स्वस्थ बसले. दुपारची बारा वाजण्याची वेळ होती. पुढे चालत जाणे तरी जरुरी होते पण श्री बाबा तेथे बसुन, *आम्ही जेवतो बुवा* म्हणू लागले. जवळचे सहकारीही भुकेने त्रस्त होऊन कोठून आपण या श्री राधाकिसनबुवां बरोबर या बाबांच्या नादी लागून प्रवासाला निघालो असे मनोमन विचार करीत तळमळू लागले. त्याचवेळी फियाटमधून आपल्या आजारी बहिणीला भेटायला निघालेली एक महिला श्री बाबाचे तेजपुंज रुप पाहून तिथे उतरुन चौकशी करून त्यांचे दर्शन घेऊ लागली. तेव्हा *तीर्थ द्या ना बुवां आजाऱ्याले* असे म्हणुन श्री बाबांची कथा सांगत ते तीर्थ श्रध्देने त्या बहिणीला पाजले. तीर्थ मुखी जाताच जादू केल्याप्रमाणे तिची ति् मस्तकदुरवी क्षणात थांबली. ते पहाताच कृतज्ञतेने भारवून जाऊन पंचपक्वान्नांचे भले थोरले ताट भरुन ती महिला फियाटने लगबगीने त्या आमराई स्थळी आली. श्रीबाबांचे मघाप्रमाणेच तेथे दर्शन घडताच, तीने प्रेमपूर्वक श्रीबाबांना त्याच बरोबर सोबतच्या भक्तगणांना पोटभर खाऊ घातले. त्यांची जेवणे उरके पर्यंत त्या महिलेने येताना सांगितलेला बॅन्डचा लवाजमा तेथे हजर झाला. मग तेथूनच मोठ्या हर्षाने श्री बाबांची निफाड गावापर्यंत वाजत - गाजत मिरवणूक काढण्यात येऊन त्या आजारी बहीणीकडे दर्शन पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर श्री राधाकिसनबुवाच्या सल्यानुसार त्या महिलेनेच फियाटने श्रीबाबांसह भक्तगणांना गांजरवाडी या गावी पोहचविले.
भक्ताधीन श्री पुंडलिक बाबा
गांजरवाडी गावी आल्यावर श्री बांबांची नयनरम्य गोजिरी मूर्ति पाहून तेथील ग्रामस्थ प्रसन्न झाले. श्री राधाकिसनबुवा यांनी रात्री किर्तनातुन श्रीबाबांचा सर्वांना यथार्थ परिचय करून दिला. त्यापूर्वी दुपारी असे धड़ले की, श्री राधाकिसनबुवांना संत तुकारामाप्रमाणेच आपल्या हातुनही भक्तिपर काही अभंग रचले जावेत असे मनोमन वाटत असे. तोच भाव मनी ठेवुन ते श्रीबाबांचे दर्शन घेतांना बाबा म्हणाले होते, *अंनत पुण्य पाहिजे ना बुवा. एक अभंग होते जा.* अगदी याच वचनानुसार श्री राधाकिसन बुवा सारख्या अगदी सामान्य अल्पशिक्षित साध्याभोळ्या व्यक्तिकडून श्री बाबांच्या कृपेनेच त्यांच्या अवताराविषयी एक अभंग रचला गेला. पुढे त्यांनी बरेच प्रयत्न करुनही दूसरा कोणताही अभंग त्यांना रचता आला नाही. या स्वरचित अभंगावरच त्यांनी रात्री किर्तन करुन श्री बाबांचे महात्म्य गाईले होते. त्यांचा तो अभंग असा होता की,
*जगतारावया, अवतार
घेशी
।आशिर्वाद
देशी, भक्तजना
॥१ ॥*
*सन
एकोणीसशे, बत्तीस
सालांत
।आला
भगवंत, अवताराशी
॥२॥*
*पुडलिकाचा
पिता, खंडूजी
हे नाव
।भावार्थाने
देव
बाळ
झाला
॥३॥*
*सत्यभाग्यवती
मंजुळा
ही आई
।तिच्या
पोटी
येई
पुंडलिक
।।४।।*
*धरला
अवतार, काटेपूर्णातिरी
।गोरेगांवनगरी, जन्म
झाला
।।5
।।
*चैत्रशुध्द
पंचमी,रोहीणी
नक्षत्र
।वंश
हा पवित्र, धनगराचा
॥६॥*
*राधाकिसन
म्हणे, ओळखिला
देव
।पुंडलिक
नाम,
अवताराचे
॥७।।*
गांजरवाडीहून श्री बाबा तारुखेर्डा येथे आले. येथे गोदावरी च्या तटावरील श्री मृगव्याघेश्वर मंदिराच्या परिसरात ते अगदी मुक्तपणे हिंडले. येथे अनेकांनी त्यांचे दर्शन घेतले. येथेच मग दातळीला घेऊन जाण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी आणलेल्या खासगाडीतून भक्तांसह श्री बाबा दातळीला येऊन पोहोचले. साक्षात भगवंतस्वरुपी, श्री पुंडलिकबाबांचे चरण आपल्या गावी लागताच इतक्या दिवसाची समस्त दातळीकरांची इच्छा पूर्णपणे तृप्त झाली. गावात त्या निमित्य केलेली भव्य सजावट व सडा रांगोळ्यानी एक वेगळेच जल्लोषपूर्ण वातावरण येथे तयार झाले होते. भाविकांची पुज्य श्री बाबांच्या दर्शन पूजनासाठी, त्यांचे मुखातील मधुर शब्द ऐकण्यासाठी एकच एक गडबड उडून गेली होती. श्री बाबांचा एकंदर येथे तीन दिवस मुक्काम झाला. तीन्ही दिवस श्रीराधाकिसजबुवाने स्वरचित किर्तने करून सर्वाची मने प्रफुल्लीत केली. येथून परत गावोगावी जाण्याविषयी वारंवार सांगितल्यानुसार श्री राधाकिसन बुवा कोंडगाव, सिन्नर मार्गे श्री बाबांना नाशिकला घेऊन गेले.
14 डिसेंबर १९४९. या दिवशी श्री राधाकिसनबुवां समवेत श्री पुंडलिकबाबा श्री संत गाडगेबाबांच्या धर्मशाळेत आले. श्रीसंत गाडगेबाबांचा मुक्काम तेव्हा तेथेच असल्याने प्रथमच त्यांची या गोरेगांवच्या भगवान *परमहंस श्री पुडलिकबाबा* समक्षच प्रेमभेट घडली. श्री बाबाच्या दर्शनाने आनंदून जाउन त्यांनी श्री राधाकिसनबुवाला श्री खंडूनाना व गोरेगांवकर पचकमेटी तुम्हाला शोधत असल्याचे सागितले. खरब खरवडीला श्री बाबाच्या लीलेनेच झोपी गेलेल्या पंचकमेटीच्या श्री माणिकरावांना दुसऱ्यादिवशी उठल्यावर श्री गोविंद खराटेकडुन श्री राधाकिसनबुवासह श्री बाबा नाशिकला गेल्याचे समजले. त्यानी गोरेगावी जाऊन हे संगितल्यावर श्री खंडुनाना व इतर भक्तविश्वस्त मंडळी चिडून त्यांनी मुर्तिजापूरला श्री राधाकिसनबुवाविरुदध श्री पुंडलिक देवाला चोरून नेल्याची तक्रार पोलीस चौकीत नोंदविली. नंतर श्री अण्णाजी मुंडेसह श्री खंडूनाना स्वताच श्री बाबांच्या शोधात रेल्वेने नाशिककडे येऊन आजूबाजूच्या गावी त्यांचा शोध घेऊ लागले. श्री संत गाडगेबाबांच्या कानीपण ही तक्रार घातल्यावर त्यांनीच दातळीला पाठविल्यानुसार नुकतेच ते तिकडे गेले होते व श्रीबाबा येथे येऊन पोहोचले. श्री बाबांच्या त्यादिवशी रात्रभर त्या धर्मशाळेतच मुक्काम घडला त्यावेळी श्री अच्युतरावदादा सिरसोकरही तेथे उपस्थित होते.
मुंबईत भगवान् श्री मुंगसाजी भेट
श्री बाबांच्या इच्छेने श्री राधाकिसन बुवा मुंबईकडे निघाले. जुन्या कुलाबा मध्ये श्री भगवान दगडू भाबडे, ठाकूरद्वारला
चंद्रभागाबाई कुटे, शिवलिला किसनराव आव्हाड, अंधेरीला परशराम दराडे, दादरला श्री भगवंतराव ठाकरे अशा विविध भक्तांच्या घरी श्री बाबांचा मुक्काम झाला. श्री खंडुनानाही दातळी येथे निराश होऊन श्री बाबा मुंबईस गेल्याचे ऐकुन पत्ते घेऊन मुंबईस आले. चर्चगेटला नगिण महालामध्ये जाऊन त्यांनी परमहंस श्री मुंगसाजी देवाचे दर्शन घेतले, येथेच श्री पुंडलिकाची भेट घडेल असे त्यांनी सुचित केले. पुढे शोधा शोध करतांना रस्त्यात श्री पुडलिक बाबांची त्याना अचानक भेट घडली. श्री राधाविसनबुवांनी मग सर्व वृत्तांत कथन केल्यावर श्री खंडुनानांचा राग पळुन जाऊन श्रीबाबांचीच सर्व लिला असल्याचे त्यांच्या ध्यानी आले.
श्री बाबांना घेऊन श्री खंडूनाना *परमहंस भगवान श्रीमुंगसाजीच्या* दरबारी हजर झाले. सायंकाळी नित्या प्रमाणे भगवान श्री मुंगसाजींची कर्पुरार्ती होऊन पुष्पाजंली समर्पण होऊ लागली. त्याच वेळी स्वतः श्री मुंगसाजी देवांनी बिल्वपत्र हाती घेऊन श्री पुंडलिक देवांना वाहिले. आर्विचे सद्भक्त श्री अण्णाजी मुळे यांनी ते बिल्वपत्र फार जपून ठेवले होते.
दुसर्या
दिवशी २७ डिसेंबर १९४९ रोजी सद्भक्त श्री यशवंतराव राजे घाटगे (पाटील) यांनी भगवान श्री मुंगसाजींनी दिलेल्या आदेशा नुसार श्री मुंगसाजी देवासह श्री पुंडलिक देवांनाही मंगल वाद्याच्या निनादात सुंगधी तेल अत्तरे लावून यथासांग स्नान घातले. नविन कफनी, शाली समर्पून पुष्पहारांनी सुशोभीत करून मंगल तिलक, अक्षदा वाहुन आरती केली गेली. त्यावेळी राजे घाटगेच्या आई कडे पाहात श्री पुंडलिकदेव म्हणाले *मा बाई ,
मला पागोटे नाही बांधले* त्यांचे हे वाक्य ऐकुन *भगवान श्री मुंगसाजींनी* आपल्या अंगावरील जरतारी दुशाला पागोट्या प्रमाणे गुंडाळूण स्वतःच श्री पुडलिक देवाच्या मस्तकी सुशोभीत केला. समर्थ सत्गुरु व सशिष्यांच्या प्रेमळ भेटीचा हा आगळा वेगळा सोहळा पाहुन नगीनमहाल परिसरात *जय भगवान श्री मंगसाजी । जय श्री भगवान पुंडलिक* असा उच्च जयघोष धुमू लागला. दुसऱ्या दिवशी श्री मुंगसाजी देवांची परवानगी मिळाल्यावर श्री खंडूनाना पुज्य श्री पुंडलिकबाबांना घेऊन श्री अण्णाजी मुळे, श्री राधाकिसन बुवा वैगरे भक्तासह गोरेगांवी परतले. गावी आल्यावर श्री राधाकिसनबुवा खिशात तपासून पाहतात तर प्रवासासाठी निघाल्यावेळी होते तितकेच फक्त साडेतिन रुपये त्यांचे कडे निघाले. अशा प्रमाणे *आम्ही व्यवस्था करु* हे श्री बाबांचे बोल त्यांना तंतोतंत पटले. गावोगांवी लोकांनी दान दक्षिणा देऊन जमलेले पैसे तेथेच प्रवास वैगरे सत्कार्यात खर्चुन परत पहिल्या इतकेच पैसे उरले. अशी होती श्री बाबांची किमया.
शेगांवी श्री गजानन दरबारी स्वागत:
२० डिसेंबर १९४९ मध्ये मुंबईतून गोरेगावी येताना वाटेत श्री भगवान पुंडलिकबाबा शेगावला उतरले होते. त्यावेळी शेगावंच्या श्री गजानन महाराज संस्थानमध्ये व्यवस्थापन कमेटी मधील एक प्रमुख सद्भक्त श्री सुकदेव पाटील यांना *श्री भगवान परमहंस मुंगसाजी महराजांच्या* खांद्यावर बसून पूज्य श्री पुंडलिकबाबा शेगावी येत असल्याचे दृश्य दिसून, *श्री मुंगसाजी महाराजानी, श्री पुंडलिक बाबा* माझेच स्वरूप आहे, त्यांचे चांगले स्वागत कर असे सांगीतल्याचा दृष्टांत झाला होता. त्यानुसार पुज्य श्री पुंडलिक देवाची स्वारी शेगांवी आलेली पहाताच त्यांनी मोठ्या श्रध्दा भक्तीने त्यांचे स्वागत करुन मनोभावे स्नान घालुन यथोचित पूजाअर्चा केली. नेैव्येद्य समर्पण केला. श्री पाटील यांच्या या संत पुजनात संस्थानचे इतर सहकारी व भक्तगणही भाविकतेने सहभागी झाले होते. अशा प्रकारे समाधीत बसलेल्या *श्री समर्थ गजानन बाबांनीच* प्रेरणा देऊन आपल्या दरबारी पूज्य श्री पुडलिक बाबांचे स्वागत घडवून सर्व संताचे अंतरीक एकत्व सहजपणेच दाखवून दीले.
शेगांवाहून पुज्य श्री बाबा नागझीरीला पूज्य संत श्री गोमाजी महाराज संस्थान मध्ये आले. येथे चालु असलेल्या नामसप्ताहामध्ये वारकरी संप्रदायातील जेष्ठ ह.भ.प. श्री धुंडामहाराज यांचे हरीकिर्तन सुरु होते. पुज्य श्री बाबांचे आगमन घडताच येथेही व्यवस्थापक व भक्तमंडळीनी त्यांचा मनोभावे आदर सत्कार करुन यथोचित पूजन केले. अशा प्रकारे संत श्रीगोमाजी महाराजांची अंतरीक भेट घेऊन श्री बाबा गोरेगांवी परतले होते.
पूज्य श्रीबाबांच्या जन्मोत्सवामध्ये संत श्री गाडगेबाबा यांचे किर्तन
बरेच दिवसांच्या भ्रमंती नंतर पुज्य श्री बाबांचे परत आगमन घडल्यावर ग्रामस्थांचा आंनद गगनात मावेना. पुर्वी प्रमाणेच परगांवचे नित्यनवे भाविक लोक श्रीबाबांचे दर्शनार्थ गर्दी करु लागले. श्री खंडूनानांनी बाबांचे मुळ जन्म घर सोडून जवळच एक छोटांसा दोन मजली वाडा बंजारी समाजा कडून अल्प किंमतीत विकत घेतला होता. त्याच्यावरील मजल्यावर पूज्य श्री बाबांची गादी असुन खालील बाजुस श्री खंडूनाना व बंधू श्री शंकरराव पातोंड आपल्या समस्त कुटुंबीयासह राहात होते. श्री बाबांवरील श्रध्देने अकोल्याच्या फुंदे बाबूंनी या स्थानी नवा जीना बांधला तर राहीत (साहित ) च्या एका मारवाडी भक्ताने पाण्यासाठी हौद बांधून दिला होता. गोरेगांवी येणाऱ्या भाविकांना श्री बाबांच्या दर्शन सुरुवात तुप्ती न होता आता आपापल्या गांवी श्रीबाबांना नेवून मोठ्या उत्साहात त्यांचे सामूहिक भजनपूजन करण्याची ओढ निर्माण होऊ लागली. त्यातूनच भेंडी (महाल) येथील श्री शेषराव देशमुख हनुमान जयंतीच्या उत्सवानिमीत्त ते बाबांना आदराने घेऊन जात. दहातोंडा (ता. मुर्तिजापूर) येथील एक बंजारी भक्त श्री प्रभुदास नाईक इतर ग्रामस्थांसह मेण्यातून मोठ्या थाटाने श्री बाबांना आपल्या गावी नेवून उत्सवाचे आयोजन करीत. तसेच कारंजा तालुक्यातील मेहा गांवच्या सौ. बहीणाबाई कानकिरड यासारखी अनेकानेक भक्तमंडळी प्रेमाने श्री बाबांचा उत्सव आपापल्या गांवी करण्यात धन्यता मानत असत. प्रथम पासुन श्री बाबांच्या जवळ राहुन सेवा करणाऱ्या सद्भक्त श्री काशीनाथबुवा (कुरणखेड) यांच्या बरोबरच श्री रामकृष्ण मुळे ( पळसोकर) देवीदास साखरे (गांव) पागल महाराज (अकोली) या सारखे निर्मळ मनाचे सेवाधारी आपल्या जीवनाचे सोने घडवीत होते.
पुज्य श्री बाबांचा महिमा आता सर्वतोमुखी झाल्याने सन १९५० मधील चैत्र शुध्द पंचमीला त्यांचा अठरावा वर्धापन दिन भव्य यात्रोत्सवाने साजरा झाला. या उत्सवात *श्री भगवान मुंगसाजी महाराजांचे* परम भक्त प्रतिभा संपन्न भक्त कवी *श्री घोगले महाराज* यांचे प्रवचन झाले. तसेच विशेषतः *सुप्रसिध्द संत श्री बद्रींबाबा (मुर्तीजापुर) श्री परशराम बाबा (पिंपळोद),
श्री नामदेव महाराज (सांगळूद) श्री अनंत बाबा (अकोला),
श्री दादाजी धुनीवाले ( तुप टाकळी),
संत सखुबाई (राजाकिन्ही)* यासारख्या अनेक सिद्ध विदेही साधू महात्मा समवेतच *संत श्री गाडगेबाबा* यांचेही आगमन घडले. रात्री आपल्या जाहीर किर्तनातुन संत श्री गाडगेबाबांनी परमहंस श्री पुंडलीक बाबा साक्षात देवच असल्याचे स्पष्टपणे सांगीतले. तसेच श्री खंडू नानांना पुनश्च स्वतंत्रपणे भेटून त्यांनी *श्री पुंडलिकबाबा* देव असल्याचा पुनरुच्चार करीत गोरेगांवी न राहता मुर्तीजापुरला श्री बाबांना घेवून येण्याविषयी आग्रहाने सुचविले. त्यावेळी श्रीखंडूनानांनी त्याबाबत पुढे पाहू म्हणून दुर्लक्ष केले.
देव भक्तांची कसोटी
नुकत्याच पार पडलेल्या भव्य यात्रोत्सवामुळे भाविकांची वाढती गर्दी, त्यांनी श्रीबाबांच्या चरणी समर्पण केलेले धनधान्यादी दान, दक्षीणा वगैरे पाहून काही दिवसापासून पूज्य श्री बाबा हे विधेही साधू असल्याने त्यांना माता पित्यांपासून विभक्त करुन स्वतंत्र पंच कमेटी नेमून त्यांची व्यवस्था पाहण्यांचा काही जनांचा दुर्विचार आता परत एक वार दुणावू लागला. त्यांनी त्या दृष्टीने श्रीखंडूनाना व बधुंना वगळून एक कमेटीही नेमली. श्री बाबाना घरी जाऊ न देणे व घरच्यांना त्यांच्या जास्त जवळ पास फिरकू न देणे हेच जणु या नविन कमेटीचे प्रमुख काम ठरून गेले असावे. श्री बाबांची किर्ती पसरून भाविकांची संख्या वाढत होती. तसेच श्री बाबा खरेच अवलिया आहेत कि नाहीत हे पाहण्यासाठी त्यांच्या पायावर जळजळते निखारे ठेवणे, गरम सराट्यांनी डाग देणे वैगरे अघोरी प्रयोगातून कसोटी घेण्याचे काम काही लोकांनी स्वबुध्दीनेच स्वतःकडे घेतले होते. पुज्य श्री बाबांच्या विषयींच्या निखळ प्रेमातुन यासारख्या घटना ऐकुन समक्ष भेटीच्या अडथळ्या मुळे श्री खंडूनाना व सौ मंजुळा मातेचे हृदय शतशः विदीर्ण होत असे.
पूज्य श्री बाबांची गादी मारोती मंदीरी स्थापून श्री खंडूनानांना मात्र घरातच बंदीस्त करुन ठेवले जाई. इतकेच नव्हे तर श्री बाबांच्या दर्शनास घरी आलेल्या भक्तांना त्यांची आई सौ मंजुळा बाई मारहान करते असाही धादांत खोटा आरोप करुन पोलीस रिपोर्टही केला गेला त्यावेळी चौकशीस आलेल्या सबइन्स्पेक्टरला उपस्थित मुसलमान जहागीरदाराने *जिच्या पोटी हा महान अवलीया जन्मला* ती आई असे कृत्य करील काय ?"
असा खडा सवाल करुन सत्याची ओळख करुन दिली. श्री खंडूनाना व सौ. मंजुळा आईला श्री पुंडलिक बाबा नंतर श्री नारायण, चंद्रकला,
सुभद्रा, विठ्ठल,
शांता, अशी अपत्य लाभली होती.
पूज्य श्री बाबांची आपल्या माता पित्यांशी ताटातूट करुन बरेच दिवस गेले. श्री खंडू नाना व सौ. मंजुळाबाई आपल्या देवतूल्य मुलाला भेटू शकत नसल्याने अंत:करणात झुरू लागले. पुज्य श्री बाबा तर सर्व काही पाहुनहि त्यांच्या अगम्य लिलेनुसार काही काळ स्वस्थ बसले होते. शेवटी एके दिनी अचानक रात्रीच्या वेळी तथाकथीत व्यवस्थापकांना निद्रेचे पांघरुन घालून पूज्य श्री बाबा घरी परतले. दारावर थाप ऐकुन श्री खंडूनानांनी दार उघडले तर दाराशी साक्षात परब्रम्ह श्री बाबाच उभे असल्याचे पाहून त्यांना अपार हर्ष झाला. त्यांनी सौ. मंजुळा मातेला उठविताच श्री बाबा भूक लागली म्हणू लागले . घरात त्यावेळी अन्नाचा पत्ता नसल्याने मडक्यातील बऱ्याच दिवसांच्या शेवया रांधून लगबगीने सौ. मंजुळा मातेने श्री बाबांना प्रेमाणे भरविले. ते खाऊन तृप्त झालेले श्री बाबा श्रीखंडूनानांना परगावी नेण्याची व्यवस्था करण्याची गडबड करु लागले. तेव्हा त्यांची आज्ञा लक्षात घेवून आपले बंधू श्री शंकरराव सद्भक्त श्रीपागल महाराज, सांभा महाराज, यासह पूज्य श्री बाबांना घेवून रातोरात लाखपूरी येथे जाण्यास पायवाटेने निघाले.