श्री पुंडलिक महाराज, मुर्तिजापुर (भाग-४)

 

भक्त प्रेमी श्री  पुंडलिक बाबांची भ्रमंती:
 

लाखपूरी येथे रात्री अचानक श्रीबाबांचे आगमन झालेले पाहून श्री भिकाजी कुंभार आनंदून गेले. त्याचे घरीच काही काळ थांबून सकाळी श्रीबाबा दुसरे भक्त श्री बच्चुलाल व्यास यांच्याकडे पोहोचले. श्री खंडूनानांनी तेथून अकोल्याचे भगवान श्री मुंगसाजींचे परमभक्त श्री देवीसिंग बैस याला निरोप पाठविला. त्यानुसार ते स्वतःच्या गाडीने तेथे येऊन मोठ्या प्रेमाने पूज्य श्री बाबांना घेऊन आकोल्यास आपल्या स्वगृही आले. श्री बाबांच्या आगमनाची वार्ता कळताच श्री अंबादासपंत आगे, हिराभाई कोमले, नामदेवराव धोपे, लक्ष्मणराव गोमाशे, नामदेवराव टांगेवाले, माधवराव थोरात, माळीपुन्यातील बाबुराव इत्यादी भक्तांना त्वरेने येऊन त्यांचे मनसोक्त पूजन केले. श्रीबाबांच्या या धावत्या भेटीत अनेक भक्तांचे सौहार्द, निर्व्याजप्रेम, सक्रिय सहकार्य वेळोवेळी उठून दिसत असे. पूज्य श्री बाबांनी दिलेल्या संकेताप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे श्री देविसिंग बैस यांनी श्री बाबाना पोहोचते केले. येथे श्री काशीनाथ आप्पा बोंदरे आपल्या सात्विक सौभाग्यवती सुशील सुपुत्र श्री सिध्दविनायक आणि त्यांच्या धर्मपत्नीसह मोठ्या आनंदाने परमपूज्य भगवान *श्री मुंगसाजी महराजांची* भक्ती करीत सुखाने रहात होते. शेतीवाडी, नोकरचाकर असणाऱ्या राजवैभवी श्रीमती बरोबरच त्यांची विनयशील संतभक्तीही वाखाणण्यासारखी होती. त्यांच्या धर्मशील पत्नी सौ. लक्ष्मीबाईना श्री बाबा काकूबाई म्हणून संबोधीत असत. त्यांची श्रध्दाभक्ती पाहून श्रीबाबाही त्यांचेकडे तब्बल दोन महिने मुक्कामास होते . त्यांच्या कन्या सौ. कौसल्याबाई दिंगबर आप्पा सुडके खामगांव ह्या आईवडीलांची पुंडलिकभक्तीची परंपरा अजून चालवित आहेत.


       येथील मुक्कामात श्रीगोकुळअष्टमीचा शुभदिन उजाडला. श्री बाबांच्या पवित्र सानिध्यात श्रीकृष्णजन्माप्रित्यर्थ विशेष पूजापाठ सुरू होता. श्री सांभा महाराज श्री बाबांच्या सेवेत होते तर तात्या महराज पोथी वाचन करू लागले. त्याच दरम्यान भेंडीकराचे जावाई श्री अनंतराव पारदकर श्रीबाबांच्या दर्शनास आले. दर्शन घेताच श्री बाबा त्यांना म्हणतात *गीता वाचली काय ? अर्जुनास श्रीकृष्ण काय म्हणे हो ?" अर्जुनाला कोणाते रुप दाविले हो ?* श्री पारदकर नम्रतेने श्री बाबांनाच उत्तर सांगण्यास प्रार्थना करुन आम्ही अज्ञानी आहोत असे म्हणू लागले. त्यावेळीस श्री कृष्णाने अर्जुनास विश्वरुप दाखविल्याचे सांगून तुम्हास दाखवू का असे विचारत त्यांनी आपल्या जवळचे एक फूल उचलून श्री पारदकराकडे भिरकाऊन दिले. त्या फुलांचा स्पर्श होताच, श्री पारदकरांची शुध्द हारपून जाऊन त्याना सर्वत्र ईश्वरी चैतन्याचा अभूतपूर्व अनुभव येऊ लागला. काही काळाने ते देह स्थितीवर येताच पूज्य श्री बाबांकडून अकल्पीतपणे लाभलेल्या या अमोलधनाची त्यांना पूर्ण जाणिव झाली. मुर्तीजापुरला फुडसप्लाय इन्स्पेक्टर हुद्दावर काम करुन गृहस्थाश्रम चालविणाऱ्या श्री पारदकरांनी या प्रसंगीच पुर्ववृत्तीचा त्याग करुन सर्व सोडून ते श्री बाबांच्या भजनप्रवचनात रमले. नंतर वैराग्य वृत्तीने केवळ परीभ्रमण करुन श्री क्षेत्र धामणगांवी काही काळ व्यतीत करुन अखेरीस मुर्तीजापुरला पूर्विप्रमाणेच श्री पुंडलिक नगरी जवळ राहून श्रीबाबांच्या पवित्र सान्निध्यात सन १९८५ मध्ये त्यांनी देह विसर्जन केले.

 

काटा" येथे श्री बाबांचे वास्तव्य
 

        वाशीम तालुक्यातील काटेपूर्णा नदीच्या उगमस्थानाजवळचे 'काटा' गाव प्राचिन कंटकॠषींचा आश्रम शिवशक्ती मंदिरामुळे भाविकाचे श्रध्दास्थान बनले आहे. पूज्य श्री बाबा चिखलीहून या गांवी येऊन सद्भक्त श्री शिवरामजी देशमुख याचे घरी काही काळ स्थिरावले. त्यांच्या बरोबर श्री खंडूनाना, सांभा महाराज, तात्या महाराज, नाना महाराज, रामकृष्ण मुळे, काशिनाथ बुवा वगैरे भक्त मंडळीही सोबत होती. श्रीबाबांच्या निवासा मुळे अनेक ठिकाणचे भक्त आता काटा येथेच दर्शनार्थ येऊ लागले. हे पाहून श्री शिवरामजीच्या मनी येथेच श्री पुंडलिक महाराज संस्थान स्थापन करण्याची इच्छा झाली. पण गोरेगांवी आधिच स्थापन झालेल्या पंचकमेटीने श्रीबाबांना गोरेगावी नेण्यासाठी यावेळी फार विनयाने कळकळ व्यक्त केल्यामुळे काटा गांवी संस्थानची इच्छा फलदृप होऊ शकली नाही.

        पूज्य श्री बाबा काट्यास असतानाच त्यांनी एक अद्भुत चमत्कार घडवून आणला श्री शेरेकर हे पती पत्नी आपल्या नारायण या मृतप्राय मुलाला घेऊन मुतीजापुरहुल डॉक्टरांच्या नकारार्थी सुचनेने निराश होऊन गोरेंगावी आले. श्री बाबांचे सदभक्त श्री उरकडभाऊच्या घरातील पूज्य श्री बाबांच्या बंगळीसमोर मुलास ठेऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे श्री बाबांचे मनापासून स्मरण करु लागले . श्री उरकडभाऊ स्वतः कापूराच्या ज्योती प्रज्वलीत करीत श्रीबाबांचा धावा करु लागले. पुर्णरात्र यामध्ये व्यतीत झाल्यावर सकाळी श्री बाबांचे तीर्थ अंगारा मुलास दिल्यावर त्याला नवजीवन प्राप्त झाल्याचे दिसून आले. यावेळी श्री उरकडभाऊंच्या पत्नी सखुबाई उर्फ सकवार यांनीही धीर देऊन श्रध्देचा मार्ग अनुसरण्यास पाठींबा दिला होता. आज अमरावतीच्या महावीर नगर मध्ये सुस्थितीत राहणाऱ्या श्री नारायण शेरेकरांकडून या विषयी कृतज्ञता पूर्वक धन्योत्तोद्गार वेळोवेळी ऐकु येतात. श्री बाबांच्या या अपार महात्म्या मुळे गोरेगाववासीय श्री बाबांच्या पुनरागमनासाठी तळमळू लागले. साऱ्याच्याच श्रध्दा एकवटून जणू सद्भक्त श्री *अभिमानदास सरदार* यांच्या काव्यातून प्रकट होऊन श्री पुंडलीक बाबांना अगदी कळवळ्याने परत येण्यासाठी प्रार्थु लागल्या त्याचे ते शब्द होते-

 

*येरे येरे भक्त वत्सला, मंजुळेच्या तु बाळा ।आठवण करीता कंठ सोकला, त्वरीत यावे वेल्हाळा ॥ध

कोठे रमला कोठे गमला, दही दुधाच्या माठाला ।भक्त इकडे वाट पाहती, दरबार तुझा फिका पडला ॥१

आमची गत बा कैसी झाली, हरणी चुकली पाडसाला | हंबरडा फोडूनी शोध लावा, जवळ करा या वत्साला ॥२॥

फारच मन कठोर केले, खंडेरायाच्या सुता मी अन्यायी बहु अपराधी, धावत येई तू आता 3।।

अर्जुनाचे घोडे जुंपले, पुंडलिक नामे अवतरला ।वेड्या पिश्याचे सोंग घेऊनी, ओळख ना दे कुणाला ||||

अभिमानदास शरणागत, पुंडलिक या योग्याला फुलापुष्पांच्या गुंफुनी माळा, घालु तुमच्या हो गळा ॥५॥  येरे येरे भक्त वत्सला, मंजुळेच्या तू बाळा ----*

 

      अखेरीस गोरेगांवकरांसमवेत सौ मंजुळा आईने केलेल्या विनम्र आर्जवी प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुज्य श्री बाबा गोरेगावी परतले . श्री बाबांच्या आगमनामुळे गावात चैतन्य भरुन गेले दररोजच्या दर्शनार्थी बरोबरच चैत्र शुध्द पंचमीला श्री बाबांच्या एकोनविसाव्या जन्मोत्सव प्रसंगी भव्य यात्राच गोरेगांवी जमली. भाविकांची गर्दी पाहून हौसे नौसे ही जमले. त्या निमीत्याने नाटक, मेळे,दंडार वैगरे मनोरंजनाचेही कार्यक्रमसादर करु लागले.

 

दानापुर ते पंढरपुर भ्रमंती:
 

       दहिगांव येथे रहाणाऱ्या सौ. यमुनाबाईंचा मुलगा श्रीकृष्ण श्री बाबांच्या कृपेने असाध्य आजारातून बरा झाला होता. त्यामुळे सौ. यमुनाबाई आपले बंधू श्री भिकाजी सितारामजी ढाकरे (पाटील) यांना दानापूरहून मुद्दाम घेऊन गोरेगांवी आल्या श्री पाटील यांना मानसिक विकृतीचा बरेच दिवस त्रास होता. श्री बाबांनी दर्शनानंतर त्यांना गावभर फिरवून त्यांच्या छातीवर जोराने गुद्दे मारले. त्यासरशी श्री पाटीलांना जोराची उलटी होऊन शरीरातील विषार नाहीस झाला त्याची प्रकृति निकोप बनली.

      पुढे पूज्य श्री बाबांना विनंतीकरून ते आपल्या अकोला जिल्ह्यातील दानापूर येथे घेऊन गेले. गावातून श्री बाबांची त्यानी हर्षोल्हासात शोभायात्रा काढली. श्री बाबांच्या दर्शनासाठी यावेळी फारच गर्दी जमून लोकांची धक्काबुक्की होऊ लागली. भाविक लोक श्री बाबांचा जयघोष करीत पुष्पवृष्टी करण्यात मग्न झाले होते. तोच तेथील एक धनगराचा महादेव नावाचा मुलगा श्री बाबांच्या रथाच्या खाली आला. रथाचे चाक त्याच्या पोटावरून गेले पण आश्चर्य म्हणजे त्यास कोणतीही इजा होता तो सुखरुप बचावला. हे दश्य पाहून श्रीबाबांच्या असामान्य आधिकाराची ओळख पटून भाविकांनी त्यांचा नामघोष उच्चस्वराने आकाशी भिडवला.

       श्री बाबांचा मुक्काम श्री भिकांजींच्या वाड्यातील तिसऱ्या मजल्यावर होता. लोक दर्शनाने तृप्त होत होते. श्री पाटील भक्ती आनंदात मशगुल हाते. पण धनधान्य संपन्न श्रीमंत पाटील यांना संतान नसल्याने गावकन्यांनाच त्याचे भारी वाईट वाटे. श्री बाबांच्या कृपाबळानेच पुढे त्यांना सुपुत्राचा लाभ झाला, जे राजकीय क्षेत्रात श्री विजयकुमार ढाकरे म्हणून सर्वजन परीचित होते, यांच्या मावसभगिनी सौ. पंचफुलाबाई सोपानराव देशमुख (अकोला) यांच्या घरीही श्री बाबांचा मुक्काम होत असे, त्यांनीच वरील दानापूरची हकीगत सांगतली आहे.

        सन १९५१ मधील कार्तिकी एकादशीस श्री भिकाजी पाटलांनी पूज्य श्री बाबांना पंढरपूरास नेले सोबत श्री खंडूनाना सौ. मंजूळामाता इतरही पाटील कुंटुबिय वगैरे भक्त मडली होती. पूज्य श्री बाबांना सांभाळण्याकरीता थांबलेल्या श्री भिकाजीरांव व्यतिरिक्त इतर सर्व श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिरी गेले. त्यावेळी श्रीबाबांनी त्यांस *"पांडुरंग किती दूर आहे ?"* अशी पृच्छा करीत स्वतःच्या ठिकाणीच *साक्षात पांडुरंगाचे* दर्शन घडविले. येथेच चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये *संत गाडगेबाबांची* गाठ पडली. पूज्य श्री बाबांना पाहून त्यांनी लोटांगण घातले आजूबाजूला जमलेल्या गर्दीला रांगेने दर्शन करण्यासाठी स्वतः ओळख करून देते ते सांगू लागले, *"अरे हा देवच आहे याच्या केवळ दर्शनाने जीवाचे कल्याण होते."* संत गाडगेबाबांसारख्या रुढी, परंपरा अंधश्रद्धा बुवाबाजी विरोधी प्रवर हल्ला चढवून समाजमने डोळस भक्त्तीने शुद्ध नितीमत्तेने सुदृढ करणार्याखंद्या समाज सुधारकाने श्री बाबांविषयी इतक्या स्पष्ट शब्दात अभिप्राय व्यक्त केल्यावर त्यांच्या दर्शनाने जिवाचे कल्याण साधू इच्छिणारा महाभाग कोण असू शकेल? पंढरपूर दौऱ्याआधी वर्णिलेल्या दानापूर गावातील अजून एक अविस्मरणिय घटना सांगणे येथे अप्रस्तुत होणार नाही. श्री भिकाजी पाटीलामुळे दानापूरला श्री बाबांचा चांगलाच परिचय घडला होता. एके प्रसंगी त्याच्या आगमनानिमित्त असाच भव्य उत्सव करुन अन्नदान भंडारा आयोजिला होता. नेमके याचवेळी येथील श्री आत्माराम नाहाटे यांची सहा महिन्याची मुलगी मृत झाली. आईवडिलांनी गावाच्या आनंदात विघ्न नको म्हणून ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती, श्री बाबांना काय कळणार नाही, बाबा स्वतःच त्यांच्या घरी कोठीत लपवून ठेवलेल्या प्रेताकडे निघाले. तेथे पिण्यास पाणी मागून त्यातील थोडे पाणी पिऊन उरलेले त्या मृत मुलीस पाजण्यासाठी दिले. ते अमृतमय तिर्थ मुखी पडताच ती मुलगी जिवंत होऊन उठून बसली. त्या मुलीचे नाव होते "मालू". पुढे हा सर्व प्रकार सर्वांना समजून जो तो अगदी थक्कच होऊन गेला.

 

श्रीखंडुनानांना ब्रम्हनिष्ठ केले
 

        गावोगावी फिरून परत काही काळ गोरेगावी थांबून पूनःश्च श्री बाबांची इतरत्र भ्रमंती चालूच असे. सन १९५१ मधील मार्गशीर्ष महिन्यात परभणी जिल्ह्यातील सातशिव या गावी पंढरपूरचे नामांकित *संत तनपूरेंच्या* नेतृत्वाने मारोती मंदिरात नामसप्तहाचे आयोजन केल्या गेले. त्याकरीता पूज्य श्री बाबांना तेथिल संयोजकांचे आग्रहाचे आमंत्रण आल्याने श्री खंडूनाना, काशीनाथ देशमुख, अजाबराव डांगे, सेवेकरी पाठक यासह पुज्य श्री बाबांना घेऊन तेथे गेले. तेथिल कार्यक्रमास अलोट गर्दी जमून फारच मोठ्या थाटात कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी तेथिल दानपेटीत हजारो रुपये जमले. त्याचे काय करावे, या विचाराने संयोजकांनी पूज्य श्री बाबांनाच त्या बाबीत विचारले. तेव्हा त्यांनी ते सर्व पैसे तनपूरेना देण्यास सांगितले. त्यावेळी श्री खंडूनानांना ते योग्य वाटले नाही. ते पैसे तनपूरे सारख्या प्रतिष्ठित महंताला देण्याऐवजी श्री बाबांच्या स्वतःच्याच आश्रमाला त्याचा उपयोग का होऊ नये?" या विचाराने श्री बाबांना तसे सूचवू लागले. त्या प्रसंगी श्री बाबा बोलले, *"नाना, तुमचा बंदोबस्त करावा लागते बुवां"*

      श्री बाबांनी काढलेले हे सहजोद्गार पुढे आपला प्रभाव दाखदित श्री खंडनानांच्या जिवनात कामक्रोधादी षडरिपुंचा पूर्ण बंदोबस्त करण्याच्या कामी यशस्वी झाले. श्री खंडूनानांचे सर्व व्यवहारिक संसारभान नासून त्यांना सर्वत्र ब्रम्हमय आनंदाचा साक्षात्कार घडू लागला. त्यांना नात्यागोत्याचा तर सोडाच पण स्वत:च्या देहाचाही विसर पडू लागला. लवकरच पूर्ण विदेहीवस्थेत ते बाह्यत: वेडसर पण अंतरी परिपूर्ण होऊन' वावरु लागले. त्यांच्या अनाकलनीय कृती बोलीने प्रथम संभ्रम निर्माण झाला तरी प्रसंग विशेषी त्यांच्या ब्रम्हबोधी सिद्धांत वाक्याने, मधुर स्वगत, गुणगुणण्याने, अर्थगर्भित संकेताने त्यांची आधिकार संपन्नता लोकांच्या लक्षात येऊ लागली. खुद्द श्री बाबांनाही त्यांच्या या परमहंस अवस्थेचा मनापासून हर्ष होई. त्यांनी लोकांना ते *सद्गुरु आहेत ना बुवा* या वाक्यानेच त्यांची योग्यता दाखवून दिली होती. श्री बाबांप्रमाणेच अनेक अगम्य कहाणींनी त्यांचे जीवन भरुन गेले होते. अनुभवीसाक्षींच्या नोंदीने त्यांचेही असेच स्वंतत्र चरित्र लिहिता येईल. *'परमहंस'* या संस्थानाच्या मासिकातून त्यांचे विशेषांक ही प्रकाशित झाले आहेत. जानेवारी ८० रोजी त्यांनी अनेकांना स्पष्ट सांगून, श्रीपुंडलिक बाबांचे पायी दंडवत करुन, *'खेळ खलास'* असे शेवटचे उद्गार काढून देहविसर्जन केला. त्यांची परमपवित्र समाधी श्री पुंडलिक नगरमध्ये दर्शनार्थी शांतीचा अनुभव देत आहे. अलिकडेच या समाधीवर श्रीखंडूनानांची पूर्णाकृती संगमरवरी मूर्ती बसविली गेली आहे. त्यासाठी अनुसयाबाई जयसिंगपुरे यांनी सेवा अर्पण केली.

 

शिवशंकर स्वरुपी श्रीबाबांची आधुनिक महानंदा:


         शिवलीलामृत पोथि वर्णलेली परम शिवभक्त श्री महानंदा पंढरपूरच्या श्री विठ्ठलांची परमभक्त श्री कान्होपात्रा यासारख्या प्रथमतः लोकनिंदीत महिला पुढे आपल्या निर्मळ अंत:करणाने केलेल्या अपार भक्ती साधनेने महान साध्वी म्हणून पुजील्या जावू लागल्या. इतिहासाची पुनरावृत्ती घडते म्हणताल अगदी त्याच न्यायाने पुज्य श्री बाबांच्या सामर्थ्यशाली प्रभावाने अशीच एक लोकोत्तर घटना घडून आली.

        खानदेश जळगावाकडचा भाग लोकनाट्य तमाशासाठी पुर्वीपासूनच आघाडीवर असे. श्रीमंताच्या घरातील लग्नकार्याच्या प्रसंगी असे मनोरंजनाचे कार्यक्रम हमखास ठरलेलेच असत. त्यावेळी जोहराबाई जळगांवकर यांची तमाशा पार्टी अवघ्या महाराष्ट्रभर आपले कार्यक्रम सादर करीत असे. पुढे वारसाणे जोहराबाईनी आपली तरुण मुलगी *कमलाबाई ला* स्टेजवर उभे केले. जन्मतः मिळालेल्या या संस्कार अनूरुप कमलाबाई तमाशात काम कारू लागल्यात. त्यांतच त्यांचे तरुण वय लोकांची गर्दी खेचू लागले. पण त्यांचे दैवच मोठे बलवत्तर म्हणावे लागेल. कारण सन १९५१ च्या सुमारास काही योगायोगांने त्यांची अकोल्याच्या श्री देविसींग बैस या परमहंस श्री मुंगसाजीदेवांच्या एकनिष्ठ भक्ताशी गाठ पडली. श्री देविसीगांना कमलाबाई मधिल सात्विकता दिसल्यामुळे त्यांनी श्री भगवान मुंगसाजीच्या उत्तराधिकारी सशिष्य *श्री परमहंस श्री पुंडलिक* देवाविषयी त्यांना माहिती सांगितली. ती ऐकून रेल्वेन त्या लगेचच श्री देविसींगासह जळगांव - नागपूर मार्गावरील काटेपूर्णा रेल्वे स्टेशनवर उतरून दोन मैल पायी गोरेगावी आल्या. श्री बाबांचे काटेपूर्णा नदीत डुबणे, बाहेर काठावर येवून रेती फासणे परत नदीत पोहणे असे नित्याचे खेळणे सुरु होते. इकडे कमलाबाई श्री बाबांच्या कौलारु घरात त्यांच्या बंगाई समोर त्यांची आतुरतेने वाट पाहत बसल्या होत्या. थोडयाच वेळात भक्त लोक बाबांचे अंग पुसुन कोरडे करीत बळजबरीने त्यांना कफनी घालण्याचा प्रयत्न करीत घराकडे घेऊन आले. अंगावरील कफनी टाकून देऊन श्री बाबा दिगंबर अवस्थेतच कमलाबाई कडे पाहू लागले. पुज्य श्री बाबांच्या देहातील अवस्थेचा वेध घेत त्याही विनम्रतेने श्री बाबांचे दर्शन घेऊन शांत निर्मळ चित्ताने बंगई समोरच बसून राहिल्या. श्री बाबांच्या कृपापूर्ण नेत्र कटाकक्षांनी त्यांच्या चित्तात आमुलाग्र क्रांती घडवून आणली. आपले यापुढेचे सर्वजीवन निखळ भक्तिमार्गाने जगण्याचा त्यांचा ठाम निश्चय झाला. श्रीबाबांची परवानगी घेऊन त्या शिंदखेडच्या यात्रेतील छत्तनसिंग दादाच्या तमाशा मधील आपल्या फडाचे नियोजित काम करण्यासाठी जाता जळगांवला घरी परतल्या. जोहराबाईना *कमलाबाई* असे अचानक घरी आलेल्या पाहून धक्का बसला. आता आपला चांगला चाललेला पोटपाण्याचा धंदा सोडून कमलाबाईला मध्येच ही काय अवदसा आठवली. असे त्यांना वाटू लागले. त्यांनी कितीही समजून सांगितले तरीही कमलाबाई परत तमाशात नाचणार नसल्याचे त्यांना पक्के ध्यानी आले. आता पूज्य श्री बाबांना घरी बोलावून घेण्याचा बेत केला. त्यानुसार श्री बाबाना आणून त्यांच्या समोरच *कमलाबाईला स्टेजवर नाचविणार नाही* असे कबूल करुन यापुढे नविन स्वतंत्र तंबू उभारुन केवळ लोकनाटय मनोरंजन करणाऱ्या संस्थेचे कमलाबाईनी फक्त व्यवस्थापन पहाण्याचे ठरविले गेले. कमलाबाईंनी पूज्य श्री बाबांच्या सत्संगतीने आपल्या जीवनाचे सुवर्ण करुन घेतले त्याबरोबरच समाजातील अनेक भरकटलेल्या धनिकांना, दुर्व्यसनी छंदिष्टांना वेळीच जागे करुन आपापले जीवन सुधारण्यासाठी तळमळीने सक्षम सांगून बरेच मोलाचे कार्य केले. पूज्य श्री बाबांवरील भक्तीने सन १९५६ मध्ये त्यांनी गोरेगांवी स्वतंत्र जागा बांधून समर्पण केली. काही काळ या कमलाबाईच्या मंदिरातच श्री बाबांचा दरबार भरत असे. सध्या श्री बाबांच्या कृपेने श्री नरेंद्र भैया चंदनकर या दोन मुलांच्या संगतीत काही वेळ आपल्या जळगांवमधील आशिर्वाद गेस्ट हाऊस मध्ये तर काही काळ श्री बाबांच्या मुर्तिजापूर संस्थान शेजारील वाड्यात त्या सुखाने जीवन कंठीत आहेत.

 

चार भट्टी यात्रा

 

      भंडारा जिल्हातील जंगल प्रदेशामधील चारभट्टी या ठिकाणी भाविकांचे श्री हनुमंताचे प्राचीन मंदिर आहे. येथुन जवळच एक मैलावर 'पुयार' नावाचे गाव आहे. येथे सलग सहा महिने धार्मिक अनुष्ठानाचा कार्यक्रम ठरविला होता. पुढे पंच कमेटीत वाद होऊन श्री विठोबा बळवंत नावाचे बंधु पुढील नियोजन करु लागले. श्री विठोबांनी *रामा* नावाचा साधा भोळा भक्त तेथील पूजेअर्चेसाठी नियुक्त केला होता. तो भाविकतेने पूजाअर्चा करुन जवळच्याच विहिरीचे पाणी काढून गुराढोरांसाठी हौदात भरुन ठेवी. रात्री अपरात्री वाघ वगैरे जंगली श्वापदेही तेथील पाणी पिऊन तृप्त होत असत. त्यांच्या त्या रामा भक्तांस कधीच त्रास जाणवला नाही. अखेरीस कार्यक्रम समाप्तीला भव्य नामसप्ताह करण्याचे ठरविले गेले. त्याकरिता श्री विठोबाभाऊ *श्री क्षेत्र शेगांवी श्री समर्थ गजानन बाबांचे समाधी मंदिरी* जाऊन हा कार्यक्रम निर्विघ्नपणे चांगला पार पडवा म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले होते. श्रींच्याच कृपेने तेथे त्यांना पूज्य *श्री परमहंस पुंडलिकबाबां* विषयी समजले. त्याप्रमाणे ते तेथुन थेट गोरेगांवी आले. पूज्य श्री बाबांचे दर्शन घेऊन कार्यक्रमासाठी त्यांना येण्यासाठी विनवून त्याकरिता सौ. मंजूळाआईकडे पैसेही देऊन ठेवले. गांवी परतल्यावर रामभक्तांने हा सर्व वृत्तांत ऐकल्यावर त्यांचे मन श्री भगवान पुंडलिकबाबांच्या दर्शनास तळमळू लागले. त्याची ओढ पाहून श्री विठोबाभाऊ त्याला घेऊन परत गोरेगांवी आले. तेथे श्री बाबांचे दर्शन घडताच तो तेथेच सेवेत रंगून गेला. त्याची इच्छा पाहून कार्यक्रमासाठी श्री बाबांना वेळेवर घेऊन येण्याकरिता त्यांस सांगून श्री विठोबाभाऊ चारभट्टीला आले. ठराविक वेळेवर श्री बाबांना तो 'रामा' भक्त चारभट्टीला घेऊन जाऊ लागताच, सौ. मंजुळाआई इतक्या लांब त्याना सोडण्यास राजी होईनात. श्री बाबांचे नित्य बाहेरगावी फिरण्याने त्यांना त्यांचा विरह सहन करणे अत्यंत कठीण जात असे. पण श्री बाबा आईला समजावीत म्हणाले, *चांगुणा काय म्हणे?* या श्री बाबांच्या बोलण्यातील आशय ध्यानी धरून त्या गप्प बसल्या. अखेरीस श्रीराधाकिसनबुवा, उरकडभाऊ, पाठक, शंकरराव पातोंड यांसह रामाभक्ता बरोबर पूज्य श्री बाबा चारभट्टीस पोहचले.

      पंढरपूरच्या कैकाडी बुवांचे अनुयायी श्री भीष्माचार्य यांच्या नेतृत्वानेच हा नामसप्ताह आयोजीला होता. त्यामुळे कैकाडी बुवा प्रमाणेच इतरही *संत गाडगेबाबाप्रेमी* सात्वीक साधक मंडळी तेथे उपस्थित होती. पण त्याच वेळी काही वाममार्गी तांत्रीक भगत लोकही तेथे जमुन आपल्या सिध्दीचे प्रयोग करुन जनतेला भयभीत करीत. त्यांच्यावर आपले वर्चस्व स्थापु लागले. पुज्य श्री बाबांनी आपला अंगारा भाविकांना जवळ ठेवण्यास सांगुन ते त्या मांत्रीकांची गंमत पहात निवांत बसुन राहीले . काही अघोरी मांत्रीक श्री बाबांसमोर येऊन काही खेळ दाखवू पाहात असतांनाच श्री बाबांनी त्यांच्या नजरेस आपली नजर भिडवली असता ते धाडधिसी जमिनीवर कोसळुन ते बेशुध्द पडले. थोड्यावेळाने श्री बाबांचे तिर्थ पाजताच ते शुध्दीवर येऊन आपली सर्व विद्या श्री बाबांपुढे हतबल झाल्याचे पाहुन खजील झाले. एकुण सप्ताह भरात वाममार्गी तांत्रीकांची पुर्ण वाताहत होऊन सगळीकडे सात्वीक भक्ती मार्गाचा जयघोष घुमू लागला. श्री कैकाडी बुवाचे प्रबोधनपर किर्तन झाले. त्यावेळी श्रीबाबांचे लाभलेली पावन उपस्थिती यांच्यासह सर्वांच्याच आनंदाची खरी पर्वणी ठरली.

       या यात्रेत मांदेडच्या श्री नथ्थुजी संभुजी बुरडे यांनी किराना मालाचे छोटेसे दुकान मांडले होते. श्री बाबांनी आपल्या लहरी नुसार त्यांच्या वस्तुची बरीच फेकाफेक केली होती, तरीही श्रध्देने ते शांत पणे पाहात राहीले. पुढे त्याची भरभराट होऊन एकाचीच पाच दुकाने थाटली गेली. एकंदरीत चार भट्टीच्या यात्रेत अनेक नवीन सद्भक्ताची गोरेगांवीच्या दीशेने वारी सुरु झाली. मुलतः याचा प्रारंभ प्रतापगड निवासी सन्यासी *श्री मंगल बुवा* यांच्या मुळे झाला. त्यांनीच प्रथमच श्री बाबांचा प्रचार त्या भागात केला होता.

 

गोरेगांव भक्तांची रीघ:

 

       पुज्य श्री बाबांचा गोरेगांवी निवास असला म्हणजे दररोज असंख्य भक्ताची अक्षरशः रीघ लागत असे. पुज्य श्री बाबांचे रुप पाहुन, त्यांचे मंजुळ शब्द कानी साठवण्यासाठी त्यांच्या कोणत्याही बारीक सारीक सेवेसाठी अनेकजण आतुर असत. प्रथमतः श्री बाबांची  वेड्यात गणना करू पाहणारे रामकृष्ण मुळे आता स्वानुभवाने गोपालकृष्ण समजूनच त्यांची निष्ठेने सेवा करु लागले. हॉटेलचा जोरदार धंदा अगदी रसातळाला आल्यावर संताच्या बोधाने आर्थीक लाभाचा सर्व विचार सोडून अकोल्यातील श्री बाबांच्या दर्शनानंतर काही काळ तेथील रजपुत पुर्यातील हीराभाईंच्या घरातील श्री बाबांच्या बंगळी समोरपूजा आरती करीत. पुढे गोरेगांवी स्थिरावलेले सद्भक्त श्री किसनराव गुल्हाने याशिवाय जयस्वाल दुकानदार वैगरे मंडळी अगदी प्रेमाने रमू लागली. श्री नानामहाराज खाडे (चांदुर तालुका) हेही श्री बाबांची निष्ठेने सेवा करुन अगदी विदेही बनून गेले.

      गोरेगांव काटेपुर्णा तिरी राहुट्या तंबु ठोकून भाविक लोक श्री बाबांनी दिलेल्या अन्नदानाचा आदेश पार पाडण्यासाठी यथाशक्य त्या ताकदीनुसार पुरणपोळी, रोडगे पासुन ते साध्या भात, भाजी, भाकरी पर्यंतचे जे शक्य असेल ते भोजन प्रेमाने एकमेकांना वाटत असत. श्री बाबांसाठी कफनी, शाल, कापड़ी बुट, डोक्यास बांधण्यास सुंदरसी रिबीन वैगरे वस्तु अर्पण करण्यासाठी लोक हौसेने घेऊन येत. यापैकी कशातच लोभ नसलेले श्री पुज्य बाबा लोकांना रोग निवारणार्थ पुदिण्याचा पाला, गाईच्या दुधातुन घेण्यास सांगने, संकट निवारणार्थ महादेव, देवी, मारूुती झेंड्याच्या दर्शना साठी परत परत पाठविणे, कोणास पाच सोमवार करण्यास सांगणे तर कोणाकडून श्रध्देने दिलेले हार फुल नारळ स्विकारुन, *पावलाना भाऊ* म्हणणे तर कधी कागद, उदबत्तीमागुन घेवून उदबत्तीने कागदास भोके पाडीत राहाणे यासारख्या गोष्टी करीत रहात. *कृष्ण काय म्हणे* *अर्जुन काय म्हणे ?* *गिता काय म्हणे ?* असे प्रश्न करीत भक्तासी सहज रितीने ज्ञानाची देव घेव करीत *संताईले पुण्य पाहीजेणा बुवा* असा बोध ठसवून कधी कधी प्रेम भराने *गोविंद राधे गोविंद* *प्यारा राम* या सारखे शब्द परत परत म्हणुन लोकांना ईश्वरी नाम स्मरणाचा सरळ मार्गच दाखवुन देत असत.

       राजना (गावंडे) येथील श्री ज्ञानदेव भानजी पाटील यांनी हत्तीसारखी धिप्पाड पाढंरी शुभ्र बैलजोडी पुज्य श्री बाबांना मोठ्या श्रध्देने अर्पण केली होती. हिच बैलज़ोडी जुंपलेल्या दमणीने असंख्य भाविकांच्या उपस्थितीत श्री बाबा विजया दशमीला सिमोल्लंघनासाठी जाऊन दसरा महोत्सव साजरा करीत, या प्रसंगी  *काटा* येथील *बंसी बॅण्ड वाले* आपल्या सहकारी पथकासह येऊन श्री बाबांच्या प्रत्येक उत्सवात सेवेची संधी कधीच सोडत नसत. त्यांच्या या प्रेमामुळेच श्री बाबा ही वेळो वेळी *बसी भाऊ* असे नाव घेऊन त्यांची आठवण काढत असत. श्री ज्ञानदेव पाटील राजनेकर यांनीच प्रथम गरुपौर्णिमा उत्सवाची प्रथा सुरु केली. त्यामुळे अनेक भक्त श्री बाबांना सद्गुरु माणून दर गुरुपौर्णिमेस श्रीफळ समर्पण करण्यास चुकता येऊ लागले.

 

भगवान श्री मुंगसाजीच्या भेटीस प्रतिनिधी पाठवले

 

        *धामणगांव (देव)* जवळील *श्री भगवान मुंगसाजी* भक्त श्री माधवराव राघोबा नवरे *लोणी* गांवी रहात असत. त्यांनी मुंबईला श्री मुंगसाजी देवाच्या दर्शनाला जाण्याचा प्रयत्न करुनही त्यांना यश आले नव्हते. पुढे नातीच्या लग्नाच्या दोन दिवस आधी ते गोरेगांवी श्री बाबांच्या दर्शना करीता गेले. त्यांनी दर्शन करताच श्री बाबांनी त्यांना त्वरीत मुंबईला *श्री मुंगसाजी देवाच्या* दर्शनाला जाण्याची आज्ञा केली. त्यांनीही घरचे लग्नाचे कार्य बाजुस ठेऊन निरोप पाठवूण ते परस्परच मुंबईला पोहोचले योगा योग असा विचित्र की, त्या बाबाच्या आज्ञेमुळेच त्यांना पुज्य *श्री भगवान मुंगसाजींचे* अखेरचे अंतिम दर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली. दि. २६ फेब्रुवारी १९५८ रोजी ही घटना घडली. जणु आपल्या श्री सद्गुरुच्या महायात्रेला प्रतिनिधी रुपानेच श्री बाबांनी त्याना पाठविले असावे.

 

टाकळघाटच्या श्री विक्तुबाबांचे गोरेगाव आगमन

 

        सध्या नागपुर भागात असलेले *श्री विक्तुबाबा* 15 एप्रिल १९१८ मध्ये टाकाळघाट गांवी जन्मास आले. बरीच वर्ष त्यांच्या हातापायात बेड्या घातल्या होत्या, त्यांचे बधु श्री बापुराव डागरे यांनी दिलेल्या माहिती नुसार सन १९४९ मध्ये सागरांच्या लाटांवर आरुढ झालेले श्री बाबा श्री विक्तुबाबांच्या डोळ्यासमोर दिसुन गोरेगांवी बोलावीत असल्याचा त्यांना दृष्टांत झाला. त्यानुसार त्यांचे बंधु काही भक्तगण त्याना घेऊन गोरेगांवी आले. श्री बाबांकडे दिवस मुक्काम केल्यावर *सोळा आणे होण्यास वेळ आहे* असे उद्गार श्री बाबांनी काढले त्याप्रमाणे पुढे सोळा महिण्यानी सन १९६० मधील कार्तिक पौर्णिमिस त्यांच्या हातापायातील बेडया गळुन पडल्या. त्यावेळी पुज्य श्री पुंडलिक बाबांचा जयघोष केला गेला. *श्री विक्तुबाबा* तर श्री बाबांना *अवतारी पुरुष* मानुन आराध्य देवते प्रमाणेच सद्गुरु रुपातही पुजत. त्यांच्या आश्रमातील आरती पूजा उपासना प्रथमतः पूज्य *श्री पुंडलिक बाबाच्या* नामोच्चार पुजनाने सुरु होत असते. अगदी अलीकडेच *श्री विक्तुबाबां* चे  महानिर्वाण झाले.

 

श्री चिंधे महाराजांना सर्पवंशातुन वाचवीले
 

       संत श्री गाडगेबाबांनी कोणी शिष्य केले नसले तरीही निष्ठेणे त्यांना गुरुमाणुन त्यांचे अनुयायीत्व पत्करलेले काही सज्जन होते. त्यापैकी यवतमाळ येथे मठ बांधुन राहणारे श्री चिंधे महाराज हे एक नावाजलेले अनुयायी होते एकदा त्यांना सर्पदंश झाला तेव्हा मठा जवळील झोपडीत नेल्यावर कफनी घातलेली बाल मुर्ती तेथे येवून त्यांचे अंगावर पाणी शिंपडून, *उद्या यांना गोरेगांवी* असे सांगुन निघुन गेली . दुसरे दिवशी श्री चिंधे महाराज इतर सहकार्यां सोबत गोरेगांवी आले. श्री बाबांचे दर्शन घेवू लागतांच, *सापाच्या तड्याख्यातुन वाचले हो बुवा* असे श्री बाबांनी उद्गार काढले. हे ऐकताच श्री चिंधे महाराजांचे डोळे कृतज्ञतेने भरुन ते सद्गदीत चित्ताने श्री बाबांचे चरणी पुनःश्च वंदन करू लागले.

 

बुधाबुवांच्या शेतीची राखन

 

      कवठा येथील बुधा बुवा हे अगदी साधे भोळे श्री बाबांचे विनम्र सेवक ते नेहमी गोरेगांवी येऊन श्री बाबांच्या सहवासात प्रेमाने रहात असत. एकदा ते असेच गोरेगांवी श्री बाबांजवळ सेवसाठी राहीलेले असतांना इकडे त्यांच्या शेतात कवठ्याला चोरांनी डल्ला मारण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी पाळत ठेवली. त्यांना शेकोटी पेटवून बसलेला बुधाबुवा तेथे दिसु लागल्याने, तो झोपी जाण्याची वाट पाहात ते पहाटे पर्यंत थांबले अखेरीस उजाडल्यावर ते परतुन आपल्या ठिकाणी गेले. नंतर गोरेगांवाहुन खुद बुधाबुवा स्वतःच परत गांवी आल्यावर त्या दिवशी बुधा बुवा तेथे नसल्याचे चोरांना समजले, तरीही त्यांच्या रूपात श्री बाबांनीच त्यांचे शेत राखण्यासाठी अशी लिला केल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेही चोरी सोडुन गोरेगांवी दर्शनासाठी येऊन पावन बनले.

 

अरे तुझी तिजोरी उघडून पहाना

 

        सन १९५८ मध्ये परमपुज्य *भगवान श्री मुंगसाजी महाराज* महासमाधिस्त झाल्या पासुन राजना (गावंडे) जि अमरावती येथे श्री ज्ञानदेव भानजी पाटील यांनी त्यांचा पुण्यतिथी सोहळा सुरु केला. त्या निमित्य *श्री मुंगसाजी देवांची* पालखी घेवून दादासाहेब राजनेकर, शंकरराव गावंडे, नारायणराव इंगळे, प्रभाकर पाटील, साहेबराव गावंडे, इतर काही राजनेकर मंडळीसह गोरेगांव, धामणगांव परत राजना येथे पदयात्रेने जाऊ लागले. या निमित्य राजना येथे पुज्य श्री बाबांना नेऊन त्यांच्या उपस्थितीत पुण्यतिथीचा मोठा उत्सव साजरा करण्यात त्यांना विशेष धन्यता वाटे.

     सन १९५९ मध्ये *श्री भगवान मुंगसाजीची* प्रथम पुण्यतिथी मोठ्या भव्यतेने साजरी करण्याची श्री ज्ञानदेव दादाची फारच तळमळ होती. त्यांची शेती वाडी वैगरे सुबत्ता असूनही नेमकी त्याच वेळी फार मोठी आर्थिक अडचन उद्भवून ते चिंता क्रांत झाले. पुण्यतिथी महोत्सवाच्या विचारात ते गोरेगांवी पूज्य श्री बाबांकडे आले. दर्शन घेवून समोर बसल्यावर त्यांची तळमळ जाणून श्री बाबा त्याना म्हणाले. *अरे तुझी तिजोरी उघडुन पहाना* तेव्हा मोठ्या निराशेने ते सांगु लागले. *बाबा तिजोरीत काहीच शिल्लक नाही* तरी श्री बाबांचे पहिलेच पालुपद कायम होते. त्यामुळे जवळच्या भक्तांनी श्री दादांना पुनश्च घरी जाऊन श्री बाबांच्या आज्ञेनुसार तिजोरी उघडून पाहण्यास सांगीतले. तेही आज्ञा शिरसावंद्य मान्य करुन गांवी आले. तिजोरी उघडून पाहु लागले. त्यावेळी त्यांना तेथे एक छोटीसी चिंधी दिसली. ती त्यांनी जोराने ओढली असताना, त्यांना पुर्वी माहिती नसलेला तिजोरीचा गुप्त कप्पा उघडला गेला. त्यातून काही सोने नोटा आढळल्या. त्यांची एकुण रक्कम एक लाख पंचविस हजार भरली. विषेश म्हणजे त्या नोटाची मुदत संपत आली असुन दोनच महिण्यांनी त्याचे मोल केवळ कागवाचा एक कपटा इतकेच झाले असते. हे त्यांचे वडीलाच्या चुलत्याने तेथे ठेवल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाले. अर्थातच अचानक धनलाभ घडवून श्री बाबांनी केलेल्या कृपा यामुळे त्यावर्षीचा पुण्यतिथी महोत्सव * भूतो भविष्यती* असा संपन्न झाला होता.

       या वेळी चांदूर येथील महादेव मंदीरा पासुन राजना पर्यंत एकविस बैलजोड्या सजावट पुर्ण गाडीतून पुज्य श्री बाबांची तब्बल पाच मैल लांब थाटाने वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सार्या गावाला पुरणाचे अन्नदान केले गेले. बारावर्ष पालकीचा नेम त्यांनी चालविला अखेरीस १९७७ मध्ये श्री दादाना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळच्या त्यांच्या तळमळीमुळे नागपुर कडुन मुर्तिजापुरला निघालेल्या श्री बाबांचे त्याच्या घरी आगमन घडून ज्याची शेवटची दर्शनाची इच्छा पुर्ण झाली. पुढे लवकरच त्यांचे निधन झाले.