श्री पुंडलिक महाराज, मुर्तिजापुर (भाग-५)

 

तू निर्दोष आहेस ना भाऊ
 

        मुर्तिजापूरचे रिटायर्ड पोलीस सबइन्स्पेक्टर श्री नानकसिंग हरीसिंह चांदेल यांना सन १९५८ मध्ये आलेला श्री बाबांच्या अमोल वाणीचा अनुभव फारच बोलका आहे. त्यावेळी मुर्तिजापुर मधील सधन धार्मीक सद्गृहस्थ श्री विठ्ठलराव जमादार हे नगराध्यक्ष होते. त्यांना जिवे मारण्याची धमकी देणारे एक निनावी पत्र आले. श्री नानकसिंग चांदेल यांच्याशी मतभेद असल्याने त्यांचा संशय घेऊन त्याविरुध्द त्यांनी केस केली. यावेळी श्री नानक सिंग पुज्य श्री बाबांच्या दर्शनास गेले असताना श्री बाबा सहजच म्हणाले *तु निर्दोष आहेसना भाऊ, कृष्ण अर्जुनाला काय सागे? तू निष्काम कर्म कर* पुढे कोर्टात निकाल लागून ते निर्दोष सुटले. कोर्टातही मुलांसह ते चालले असताना एका कोळयाच्या रुपात श्री बाबांनी त्यांना दर्शन देऊन वरील आशयाचे अभय वचन दिले होते. पण त्याना समजले नव्हते. ते गोरेगांवी परत दर्शनासाठी आल्यावर श्री बाबांनी खूण सांगुन त्याची आठवण दिली.


तो मरत नाही ना बुवा:
 

        नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून श्री गु. मा. सोमवंशी काम करीत होते. तेव्हा सन १९५८ मध्ये त्यांचा धाकटा मुलगा श्रीकांत पाच वर्षांचा असताना विषमज्वर उलटून ४२ दिवस तापाने फणफणला होता. त्याच्या काळजीने चिंतामग्न झालेले श्री सोमवंशी, मुलगा हातात लागणार नाही या हताशेने निराश होऊन तळमळत झोपी गेले. त्यांना स्वप्नात श्रीबाबांचे दर्शन घडले. श्री बाबांनी त्यांचे कुशल विचारल्यावर त्यांनी मुलगा मरत असल्याची तक्रार केली. त्यावेळी श्री बाबा त्यांना म्हणाले, *तो मरत नाही ना, बुवा* आणि खरोखरीच दुसऱ्या दिवसापासून त्या मुलाच्या तब्बेतीत आश्चर्यकारक सुधारणा घडून तो लवकरच निकोप झाला. पुढे प्राध्यापक असतांनाच श्री बाबांच्या एका भक्तांनी त्यांना प्राचार्य म्हणून संबोधले तेव्हा त्यांनी त्याला त्यांची चूक सांगितली. त्यावेळी तो म्हणाला श्री बाबांनीच अजाणते हे बोलविले असले तरी लवकरच तसे निश्चित घडेल. त्याप्रमाणे घडून १८ जून १९६० मध्ये ते अकोटच्या श्री शिवाजी महाविद्यलाचे प्राचार्य बनून काम पाहू लागले.

 

संत बद्रीबाबांनी स्वत: पूजन केले

 

       पुज्य श्री बाबांच्या कडे विविध मनोकामना घेउन येणारे अनेक भक्त असत, तर काही पारमार्थिक साधनेसाठी आशिर्वाद मागणारे चांगले साधकही येत असत. पण त्याचबरोबर स्वतः पूर्णकाम बनलेले परिपूर्ण ज्ञानी विदेही अवस्था गाठलेले अधिकारी महात्मेही केवळ अंतरिक ओढीने परस्पर प्रेमभेटीसाठी आवर्जून गोरेगांवी येत असत मधापुरीचे लहरीबाबा, अकोल्याचे अनंतबाबा, पातूरचे पितांबर बाबा यासारखे अनेक थोर विदेही साधू अंतस्थ ओढीने श्री बाबांच्या भेटीस येताना दिसत. त्यापैकी एक महान सत्पुरुष *श्री संत बद्रीबाबा* अनेक वेळा श्री बाबांना भेटले पण महासमाधी घेण्यापूर्वी वृद्धावस्थेतही ते मुद्दाम गोरेगावी आले. पूज्य श्री बाबांचा मुक्काम त्यावेळी *सद्भक्त श्री उरकड़ भाऊच्या* घरातील बंगळीवर होता. संत बद्रीबाबांनी सोबत आणलेल्या भक्ताला पूज्य श्री बाबांची पूजा करण्यास सांगितले. त्यानुसार तो भक्त हाती पूजेचे तबक घेऊन त्याच्या बुद्धीप्रमाणे श्री बाबांच्या मस्तकी कुंकुमतिलक लावीत *ऐसा नहीं, ऐसा लगाना चाहिये ये फुल शिरपर ऐसा चढाना चाहिये * असे स्वगत बोलत त्यांनी श्रीबाबांची संपूर्ण पूजाच करुन दाखविली. श्री बाबांवर त्यांचे फारच प्रेम होते. ते श्री बाबांबद्दल नेहमी म्हणत, *ये बडी नाचनघुंगरी है रे, ये सब जगको नचायेंगी*

 

निरक्षराकडून ज्ञानेश्वरी प्रवचन
 

          पूज्य श्री बाबांचा मुक्काम कुटासा येथे असतांना अनेक भक्त आपापल्या अडचणी निवारणार्थ दर्शनाला येत असत. पण त्या गर्दीत दर्शनाला येणाऱ्या श्रीमती कलावतीबाई टाकोणकर यांची वृत्ती मात्र फारच वेगळी होती. त्यांचे सारे मन परमार्थिक ज्ञानाकडे होते. त्यांचे शिक्षण झाले नसल्याने कोणतेही ग्रथंवाचन त्यांना शक्य नव्हते पण *श्री ज्ञानेश्वरी* वाचनाची त्यांना अंत:करणापासून ओढ होती. पूज्य श्री बाबांच्या दर्शनामागे त्यांची हीच प्रार्थना असे. एके दिवशी श्री बाबांनी कृपा दृष्टीने पहात मस्तकी आपला वरद हस्त ठेवला आणि त्या निरक्षर महिलेला आपसूकच अक्षर ज्ञान घडून हळूहळू संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचता येऊ लागली. मग रात्रंदिवस त्यांनी तोच ध्यास ठेवून ज्ञानेश्वरीची पारायणे सुरु केली. त्यातूनच त्यांना अर्थाची उकल घडून त्या प्रवचने करु लागल्या. पंढरपूरला चार्तुमास अनुष्ठाने केली. अखेरीस कुटासा जवळ एकलारा या गांवी त्या ब्रम्हलीन झाल्या.

 

श्री बाबा पोलीस अधिकाऱ्यांच्या रुपात

 

        पूज्य श्री बाबांची भक्त रक्षणार्थ गांवोगावी भ्रमंती चालू असे तर कधी गोरेगांवी स्थिरावूनही त्यांचे हे कार्य सुरु असे. श्री बाबा गोरगांवी असतांनाच त्यांची एक अजब लीला दिसून आली. पूज्य श्री बाबांची एक स्त्री भक्त दर्यापूरहून आपल्या माहेरी निघाली होती. अंगावर सोन्याचे अलंकार घालून दमणीने त्यांचा प्रवास चालू होता. मध्येच आडरस्त्याला काही सशस्त्र गुंडानी त्यांची वाट रोखून बरोबरीच्या मंडळींना धाक दाखवून सर्व दागिने, पैसे ताब्यात घेतले. ती स्त्री या प्रकाराने फारच घाबरून जाऊन पूज्य श्री बाबांचा मनापासून धावा करु लागली. तोच त्या चोरांना घोड्यावरुन एक पोलीस अधिकारी येतांना दिसला. त्याला पहाताच सर्व दागिने, पैसे तेथेच टाकून ते चोर धुम पळाले. पुढे गावापर्यंत त्या पोलीस अधिकाऱ्यांची त्यांना सोबत मिळून सुरक्षितपणे प्रवास झाला. या भयंकर आपत्तीपासुन श्री बाबांनी रक्षण केल्यामुळे त्या बाई गोरेगांवी कृतज्ञतेने दर्शनासाठी आल्या, त्यांना पहाताच श्रीबाबा म्हणाले *आम्हींच घोड्यावरुन आलो होतो, पण घरी चला नाही ना म्हटले*

 

तेल देत नाही अन दर्शन कायले?
 

         गाझीपुर येथील एका मुलीची श्री बाबांवर फार भक्ती होती. ती दररोज घरी त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना नैवेद समर्पन करीत असे. यथावकाश तिचे लग्न होऊन ती सासरी गेली, तेथेही ती भक्तीने आपला नियम चालवीत होती पण सासुबाईंची त्यावर इतकी श्रध्दा नसल्याने त्यांना ही गोष्ट तितकिशी आवडत नसे. श्रीबाबांच्या पूजेनंतर चटणी भाकरी चा साधा नेवैद्य दाखवितांना दररोज त्यावर तेल वापरते म्हणुन सासुबाईंनी तेलाचे भांडेच लपवून तेल देण्याचा नियम केला. पुढे योगायोगाने त्यांचे गोरेगांवी येणे झाले. त्यावेळी श्रीबाबांचे दर्शन घेऊ लागताच श्री बाबा त्यांचेकडे पहात म्हणू लागले *तू तेल देत नाही बाप्पा, अन येथे दर्शन कायले ? आम्हाले लय तिखट लागते बाप्पा*  हे कानी पडताच सासूबाईंची वृत्ती बदलून त्या सूनेला पूजेत अडथळा करण्याचे त्यांनी सोडून दिले.

 

सद्भक्त पांडुरंग मुंदेकरांचे भक्तिकार्यः

 

       मुळचे 'खरवाड़ी' गांवाचे रहिवासी श्री पांडुरंग मुंदेकर अमरावतीला शिंपीकाम करुन उदरनिर्वाह करीत. पहिल्यापासून संतदर्शनाची आवड असणारे श्री मुंदेकर सद्ग्रंथांचे वाचनही करत. पुढे योगायोगाने धामणगाव, शेगांव याच बरोबरच ते गोरेगांवी श्री बाबांच्या दर्शनास आले या दर्शनानंतर त्यांचे चित्त श्री बाबांच्या चरणी एकरूप होऊन गेले. त्यांना स्वप्नात श्री मुंगसाजी देव श्री बाबांचे दर्शन घडून सुचक संदेश मिळाला. त्यानुसार ते नागपूरला गेल्यावर आपले स्नेही श्री लक्ष्मणराव राऊत, सोनी, बाबा जोशी, हिरामण तांदूळकर वैगरे भाविकांच्या भेटीत श्रीबाबांचे एखादे भक्तजण मंडळ नागपूरला स्थापावे म्हणून ठरवून गोरेगांवी आले. येथे येताच श्रीबाबा श्री राऊतांच्या मांडीवर बसून *नागपूरचे संत्र चारा भाऊ, नागपूरला कोणते संत झाले ?* असे बोलू लागले. त्यावेळी श्री बाबांचा हा संमती दर्शक आशिर्वाद समजून नागपूरला मंडळ स्थापन केले गेले. १२ ऑक्टोबर १९६३ ला साकोली वरून येतांना श्री बाबा नागपूरला आले. सन १९६४ पासून श्री मुंगसाजी देवांच्या पुण्यतिथीचा भव्य महोत्सव श्री बाबांच्या उपस्थितीत नागपूर भक्तजन मंडळातर्फे करण्याचे ठरविले गेले. त्याला श्रीबाबांची अनुमती मिळाली. श्री बाबांच्या आगमनाने नागपुरात भक्तीला उधाण आले. शहराच्या प्रमुख मार्गावरुन दिंड्या पताका, भजनी मेळे, सुस्वर वाद्यवृदाच्या साथीत पुष्पलतांनी सजविलेल्या रथातून श्री बाबाची देखणी मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याने भाविक लोक पुष्पवृष्टी करीत मंगल आरतीने श्री बाबांचे स्वागत करीत होते. श्री बाबांच्या जवळच बसलेले सद्भक्त श्री बाबा धांडे या श्री बाबांच्या राजवैभवी स्वागत सोहळ्याने मनोमनी हरवून गेले असतांना श्री बाबा त्यांना म्हणू लागले *मर्त्य मानवासाठी रे* यातून सगळ्यात असून कशातही नसलेल्या पूज्य श्री बाबांचा वीतराग भाव सहजपणेच त्यांच्या ध्यानी आला, नागपूरच्या या उत्सव प्रसंगी इतरही अनेक विदेही संतमहात्मे श्री बाबांच्या प्रेमभेटीस येत असत. श्री कडू, दंभाळे, वानखेडे, बंड, घारट, लालझरे, कागदे, तितरमारे, देशमुख, डाखोरे, हटवार, दादीलवार वगैरे अनेक सद्भक्तांनी नागपूरच्या भक्तजन मंडळाचे कार्य सेवाबुद्धीने पाहिले. पुढे श्री मुंदेकर यांनी अमरावतीलाही श्री बाबांच्या भक्तांना एकत्रित करून उत्सव सुरू केला. श्री कल्याणकर बंधू, ठाकरे, बकाले, बुटे, उघडे, मोकासे, घारड, भाकरे, गवारले, धर्माळे, आसटकर वगैरे अनेकानेक भक्त मंडळीनी मोठ्या निश्चयाने प्रयत्न करुन श्री बाबांची संगमरवरी मूर्तीही प्रतिष्ठित केली आहे.

 

पारडसिंगा चे भाग्य उजळले

 

         नागपूर जवळील काटोल तालुक्यामध्ये पारडसिंगा गांवी *श्री यावदराव चोपडे* नावाचे श्री बाबांचे एक भक्त रहातात. नागपूरला श्री बाबांचे शुभागमन घडू लागल्यावर आपल्या गावीही त्यांना घेऊन यावे अशी तळमळ सुरु झाली. त्यानुसार सन १९६६ मध्ये नागपूरला श्री बाबा आल्यावर तेथूनच पूर्वनियोजित कार्यक्रमानूसार ते पारडसिंगा येथे आले. तेथील भाविकांनी अपूर्व उत्साहात त्यांची मिरवणूक काढून स्वागत केले. श्री बाबांच्या या मिरवणूकीच्या मार्गावरच एका पडवीत *ब्रम्हनंदाच्या मस्तीत रंगून गेलेली* पण गांवाच्या दृष्टीने *एक सामान्यवेडी स्त्री* आपल्याच तंद्रीत बसली होती. *संताचा अधिकार संतच ओळखणार* या न्यायाने श्री बाबांची तिची केवळ नजरेनेच भेट घडली. दुसऱ्या दिवशी गोपालकालाच्या दहीहंडी कार्यक्रमापूर्वीच श्री बाबा नागपूरला निघून गेले या *अधिकारी स्त्री* विषयी लोकाना आपोआपच आदरभाव वाटून तिच्याच हस्ते गोपालकाला केला गेला. यानंतरच या *साध्वी स्त्रीचे* अनेकांचे अतर्क्य अनुभव लोकांच्या दृष्टोपत्तीस येऊन तिचा महिमा सर्वत्र पसरला. ती साध्वी स्त्री म्हणजेच आजच्या *पारडसिंग्याच्या सुप्रसिद्ध संत श्री सती अनसुयामाता होय* श्री बाबांच्या भेटीनेच हे लपलेले अधिकारसंपन्न संतत्व पुढे प्रकाशित झाले. त्यांचे अंतर्गत प्रेम ओढीनेच त्याही नागपूरला श्री बाबांच्या आगमना प्रसंगी आवर्जून उपस्थित राहू लागल्या.

 

पुंडलिकानुज श्री नारायणभाऊ

 

        पूज्य *श्री पुंडलिक बाबांच्या* जन्मानंतर *श्री खंडूनाना सौ. मंजुळा मातेला* लाभलेले दुसरे अपत्य म्हणजे *श्री नारायणभाऊ* पूर्वजन्मसंचित श्री बाबांचीच अपार करुणादृष्टी यामुळे त्यांचे लहान बंधु म्हणून श्रीनारायणभाऊना अगदी जन्म:ताच दुर्लभ संत संगतीचा अगदी सुलभ लाभ घडला. राजन्याचे श्री ज्ञानदेवदादांनी त्यांचे शिक्षण करविले. श्री नारायणभाऊ तसे स्वतंत्रबुद्धीचे, हुशार,मनमिळावू लोकसंग्रही वृत्तीचे असल्याने श्री बाबांच्या वाढत्या भक्त परिवाराशी यथायोग्य संपर्क ठेवून सर्वांना श्रीबाबांचे पुण्यदर्शन, सत्सहवास लाभावा या नियोजनपूर्ण सेवाकार्य करण्याच्या दृष्टीने त्यांनी कॉलेज मधून शिक्षण सोडून हेच प्रमुख सेवाकार्य सर्वतोपरी अंगीकारले. वेगवेगळ्या गांवाच्या भक्तांना श्री बाबांचे महात्म्य समजावे, त्यांची जवळीक लाभावी म्हणून त्यांची नेहमीच धावपळ सुरु असे. आजच्या घडीलाही त्यांचे हे सत्कार्य सर्वांना दिसून येतच आहे. मोठ्या शहरातील श्रीमंतापासून ते छोट्या खेड्यातील गोरगरीबांच्या झोपडीपर्यंत पूज्य श्री बाबांना केवळ प्रेमभक्ती पाहून घेऊन जाण्याचे श्रेय यांनाच द्यावे लागेल.

 

श्री तुकडोजींची अपूर्व पुंडलिक प्रीती

 

       वरखेडचे *परमहंस श्री आडकोजी महाराजांचे* कृपापात्र सतशिष्य *श्री तुकडोजी महाराज* हे वन्हाडचे संतरत्न, पुढे सार्या *भारताचेच राष्ट्रसंत* म्हणून ओळखले जाऊ लागले. श्रीसद्गुरुंच्या कृपावर्षावाने श्री तुकडोजींनी केलेल्या साधनेस साक्षात्काराचे फळ लाभले. आपल्या खड्या आवाजात खंजीरीवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने सहजलीलया बोटे फिरवीत स्वरचित प्रासादिक कवने म्हणत त्यांनी भक्ती नीती-देशप्रीतीचा संदेश देऊन सारा समाज जागवला. त्यांनी लिहीलेली *ग्रामगीता* केवळ गांवाचेच नव्हे तर राष्ट्राबरोबर अखिल विश्वाचेच नंदनवन करणारी आहे. त्याकरिता जरूरी आहे सक्रीय सुज्ञ सज्जनांची, रत्नाची किंमत जव्हेरीच करणार तसेच संताचे मोल करण्यास साधुच व्हावे लागेल. *श्री परमहंस अडकोजींच्या* वरदहस्ताने श्री तुकडोजींनाही संतत्वाचे मोल ध्यानी आल्याने त्यांचा नेहमीच अनेक साधूसंतांशी संपर्क असे. *श्री भगवान मुंगसाजीच्या* स्थानी ते आता पूज्य *श्री पुंडलिक बाबांना* मानू लागले होते. सन १९६७ मधील *परमहंस श्री अडकोजी* महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी त्यांनी मुद्दाम गाडी पाठवून *श्री पुंडलिक बाबांना* वरखेडला बोलावून घेतले होते. श्री बाबा यासोबत त्यांचे धाकटे बंधु श्री नारायणभाऊहीं होतेच. व्यासपीठावर विद्वानांच्या भाषणाचा कार्यक्रम चालू असतांना श्री नारायण भाऊंच्या हाताला हिसका देऊन, परत परत त्यांना थोपविण्याचा प्रयत्न करूनही ऐकता श्री बाबा सरळ व्यासपीठावर चढले. सर्व जनसमुदाय उत्सुकतेने पहात असतानाच ते थेट *श्री तुकडोजींच्या* मांडीवरच जाऊन बसले. तेव्हा अस्वस्थ झालेल्या श्री नारायणभाऊंना धीर देत श्री तुकडोजी आनंदाने भावविभोर होऊन नजिकच्या फोटोग्राफरला हाताने खुण करून हे दृष्य टिपण्यास सांगु लागले. श्री बाबा श्री तुकडोजींशी प्रेमाने बोलु लागले. त्याच ओघात त्यांनी उच्चारलेले *आपण तर इंडियाचे साधु* हे वाक्य आजूबाजूच्या लोकांनी ऐकून सर्वांनाच आनंद झाला. तब्बल विस मिनिटांनी श्री बाबा त्यांचे मांडीवरुन उठुन बाजुला लोडास टेकून बसले. त्यावेळी राष्ट्रसंत आपल्या भाषणातून म्हणाले, *पुंडलिकाची स्थिती आमचे गुरु आडकोजी सारखीच आहे. अशाच विदेही संताच्या कृपेने हा विश्वगाडा चालतो आहे* यावेळी परमहंस आडकोजीचे समर्थ सतशिष्य योगीराज संत सत्यदेव बाबा, सालबर्डीचे मारोती महाराज, अकोल्याचे अनंतमाहाराज वैेगरे संतमंडळीही उपस्थित होती.

       सन १९६७ मध्ये चेंङडिकापूरला राष्ट्रसंत श्री तुकड़ोजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली श्री अच्युत महाराजांच्या उपस्थित राजा कुर्मींनी धार्मिक कार्यक्रम आयोजिला होता. त्यामध्येही पूज्य श्रीबाबांना आग्रहाने नेण्यात आले होते. त्यांची पावन उपस्थिती सर्वाचे प्रमुख केंद्रस्थान बनून राहिली होती.

       सन १९६८ मधील चैत्रशुद्ध पंचमीला *श्री बाबांच्या* जन्मोत्सव प्रसंगी *श्री तुकडोजी महाराज* स्वतः गोरेगावी आले होते. श्री बाबांचे दर्शन पूजन करून त्यांनी आपल्या भावमधुर भजनाचा कार्यक्रमही येथे सादर केला. इतकेच नव्हे तर श्री बाबांवर त्याच वेळी त्यांनी स्वयंस्फूर्तीने एक भजनही रचले. ते असे होते.

 

*मोठ्या प्रेमाने, भक्तिभावाने, जन येती

पुंडलिक महाराज, तयांना दर्शन द्या ।। धृ

*जीवनाचे हे संकट टाळण्या, संताविण कोणी नाही

देव देवळे प्रार्थायाशी, दिसेना चेतन काही

एका संताच्या ठायी असे, देव धर्म साकार ॥१ *

*निसर्ग सगळा विकृत झाला, अशांत सारी जनता गरीब गुदाचा वाली कुणी ना, तुच पिता अन् माता

घेई दुबळ्यांना पदराशी, देण्या भावी आधार  ।।२।।*

*सर्व तुम्हाला कळते काही, जनतेची आकांशा

तुकड्यादास म्हणे, घ्या सगळे, संत मार्गाची दिक्षा

या हो या सगळे करण्याशी, जिवाचा उध्दार ॥३ ।।*

 

          या कार्यक्रमानंतर काही दिवसांनी श्री तुकड़ोजी महाराजांच्या कर्करोगांची तीव्रता वाढली. त्यांचा हाच शेवटचा भव्य कार्यक्रम ठरला. त्यांच्या अत्यवस्थ स्थितीत श्री बाबांना गुरुकुजमध्ये त्यांच्या भेटीस नेण्यात आले श्री बाबांचे भेटीने त्यांच्या मुद्रेवर हास्य झळकले. *तुमचे काम झाले नां, भाऊ* असे म्हणत तेथून श्री बाबा परतले त्यानंतर लवकर राष्ट्रसंतांनी देह विसर्जन केला.

         सन १९६९ मध्ये अमरावतीच्या मोझरीमधील गुरुकुंजात *श्री राष्ट्रसंताची* प्रथम पुण्यतिथी भव्य प्रमाणात साजरी झाली. त्यावेळी अनेक साधू- संन्यासी ते थेट नामवंत राजकीय पुढारी श्रध्देने तेथे जमले होते. कार्यक्रमस्थळी उपस्थितांना योग्य ती बैठक करून मध्यभागी पांढरे शुभ गादीलोडाचे, सुगंधी पुष्पहाराने सजविलेले श्री गुरुदेवाचे निर्गुणस्थान बनविले गेले होते. यावेळी पूज्य श्री बाबांनाही विशेष आदराने पाचारण केल्यामुळे श्री नारायणभाऊ, बाबा धांडे सेवाधारी गुलाब मोहोड, पाठक यांसह तेही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ऐनवेळी बाबा धांडेचा हात धरून श्री बाबांनी त्यांना त्या निर्गुण आसनावर बसण्याची प्रेरणा देऊन स्वतः त्यांच्या मांडीवर ते स्थानापन्न झाले. हजारो लोकांनी ने पाहून आनंदाने *श्री बाबांचा* जयजयकार केला, श्रीनारायणभाऊ या प्रकाराने भांबावले असतांना तेथील संयोजक ठोसर यांनी याबाबत आनंद प्रदर्शित करुन श्री बाबा योग्य स्थानीच बसल्याचा निर्वाळा दिला.

 

नेरपरसोपंत येथील सोहळा:

 

        यवतमाळ जिल्ह्यातील पाथ्रड गोळे येथील श्री बाबांचे परमभक्त श्री बापुरावजी गोळे यांनी एकदा आपल्या नेरपरसोपंत येथील वाडयावर मुद्दाम *श्री बाबांना* आमंत्रित केले होते. तेव्हा गांवातून मिरवणूकीने त्यांनी श्री बाबांना घरी आणून त्यांची सर्व कुटुंबियांसह मनसोक्त पूजाअर्चा केली. त्यावेळी दर्शनार्थी गर्दी फारच जमली होती. त्यामध्येच श्री विजयकुमार देशमुख हा काहीसा नास्तिक असलेला कॉलेजचा विद्यार्थी उभे राहुन जिज्ञासेने सर्व सोहळा पहात होता. अचानक त्या गर्दितुन श्री बाबांनी त्याला पुढे बोलावले तेव्हा नकळतच त्याने दर्शन घेतले. भाविकांची दर्शने सुरुच होती. आपणही काही प्रश्न विचारावे असे त्याच्या मनात असूनही त्याची हिम्मत होईना. त्याच दरम्यान श्री बाबा पलंगावरुन उठून त्याच्या मांडीवर येऊन बसले. त्यांचे त्यास काहीच वजन वाटेना. नंतर ते हळूहळू त्या युवकाशी *कृष्ण काय म्हणे? अर्जुन काय म्हणे?* असे प्रश्न करीत पुढे पुढे ज्ञानयोग, कर्मयोग सांगत *श्री मुंगसाजीदेवांच्या* आरतीचे धृपद आळवू लागले. त्याप्रसंगी त्याची श्रद्धा जागृत होऊन त्याला संत महात्म्य पटले. श्री बाबांच्याच कृपेने पुढील शिक्षणातही त्यास यश लाभत गेले. श्री बापुरावजी गोळे, त्यांच्या धर्मपत्नी मुले-मुलीही श्री बाबांच्या सेवेने सदा संतुष्ट रहात. त्याच दरम्यान धनज (माणिकवाडा) येथील संत रामदेवबाबा या गुप्त अवलिया साधूचा प्रत्यय आल्याने त्यांची सर्वप्रथम प्रगट पूजाअर्चा करण्याची सुसंधीही याच श्री गोळे कुटुंबियाला लाभली.

 

दुर्व्यसनातून सोडविले

 

       हातुर्णा येथील श्री गंगाधरराव दुर्णे हे गृहस्थ चांगले सधन सुखी समृद्ध होते. पण दुर्दैवाने त्यांना दारुचे भारी व्यसन जडले. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा कमी होऊन सर्वत्र हेटाळणी सुरु झाली त्यावेळी त्यांचे ध्यानीमनी नसतांना त्यांचे स्वप्नात एक बालमुर्ती येऊन, *तू गोरेगांवी दर्शनास ये* असे म्हणाली. त्यानुसार शोध करीत ते गोरेगांवी पूज्य श्री बाबांच्या दर्शनासाठी आले. श्रद्धेने ते श्री बाबांच्या चरणाला स्पर्श करु लागताच श्री बाबा म्हणाले, *भाऊ दारू मटन सोडले काय?* श्री बाबांच्या या शब्दाने विलक्षण नवल घडून त्यांच्या मनात या दुर्व्यसनांविषयी घृणा निर्माण झाली. त्यांनी तेथेच त्याचा त्याग करण्याची शपथ घेऊन पश्चातापबुध्दीने श्री बाबांना वंदन केले. सलग वीस वर्षे त्यानी रथसप्तमीला उत्सव करुन अन्नदान भंडारा केला. हातुर्णा या गावी त्यांनी श्रद्धेने श्री बाबांना नेवून पूजाअर्चा केली.

 

आगी पासून वाचविले

 

        दर्यापूरमधील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एम. . महात्मे हे एक ज्ञानी, बहुश्रुत सद्भक्त एकदा ते घरी गाढ झोपेलेले असतांना त्यांच्या पलंगा शेजारील दिवा त्यांच्या गादीवर पडून अचानक आग लागली. श्री. महात्मे यावेळी गाढ झोपेत असतांनाच श्री बाबांनी त्यांना थापट्या मारीत जागे केले. त्यावेळी जागे होऊन ते पाहातात तो चौफेर अग्नीच्या ज्वाळा, त्यातून ते कसेबसे त्वरेने बाजूला झाले. केवळ श्री बाबांनीच त्याना या आगीपासून वाचविले होते. त्यामुळे कृतज्ञतेने ते त्यांचे नित्य स्मरण करू लागले.