श्री पुंडलिक महाराज, मुर्तिजापुर (भाग-६)

 

श्री दत्तप्रभुनीच गोरेगांवी पाठवले

       यवतमाळचे श्री महादेवराव निवल हे दत्तात्रेयांचे परमभक्त होते. दर पौर्णिमेला चुकता माहुरला *श्री दत्तप्रभुच्या* पवित्रस्थानी जाऊन दर्शन घेण्याचा त्यांचा नियम कधीही चुकत नसे. देवाकडे काहीही मागता केवळ निष्काम बुद्धीने सेवा उपासना केल्यास जरुरत्या संकट समयी तो आपोआपच मार्ग दाखवितो अशी त्यांची ठाम श्रद्धा होती. श्री अंबादासपंत आगे यांच्या आग्रहाने सन १९५४ च्या दरम्यान ते गोरेगांवी आले. श्री बाबांचे दर्शन घडल्यावर त्यांच्या तेज:पुंज नयनमनोहारी रुपाने त्यांचे मन वेडावून गेले, केवळ वेळेचे बंधन म्हणून मनाला बांध घालून ते गावी परतण्यास निघाले. श्री बाबांनी त्यांना काही सूचक शब्द सांगितले. घरी गेल्यावर त्याचा त्यांना प्रत्ययही आला. तसेच ते दुपारी वामकुक्षी करीत असतांना त्यांच्या स्वप्नात साक्षात श्री दत्तप्रभू श्री बाबांची गोजिरी मुर्ती उभी राहून श्रीदत्तप्रभुंनी ते स्वतः श्री बाबांशी अभिन्न असल्याचे झोपेतून जागे झाल्यावर त्यांनी याचा योग्य बोध घेऊन त्याप्रमाणे पुढील प्रत्येक पौर्णिमिस ते गोरेगांवची वारी करीत श्री बाबांचे दर्शन घेवू लागले.


Table Of Contents

 

विव्हा मांडव्याचे श्री श्रद्धानंद सरस्वती
 

       औरंगाबादमधील पैठण जवळच विव्हा मांडवा येथे संन्यासाश्रमी *श्री श्रद्धानंद सरस्वती* रहात होते. त्यांची श्रीबाबांवर फारच प्रीती होती. ते श्री बाबांना प्रत्यक्ष *श्रीरामच* मानत असत. त्यांनी मोठ्या भक्तीने विव्हा मांडवा येथे श्री बाबांना नेवून त्यांची पूजाअर्चा करून तेथील भाविकांना दर्शनाचा लाभ मिळवून दिला. त्यांनी श्री बाबांच्या मस्तकी चांदीचा मुकुट अर्पण करुन त्यांची भव्य शोभायात्राही काढली होती. श्री बाबांच्या महासमाधीनंतर त्यांनीही गांव सोडून नर्मदेच्या पवित्र तीरावरील *ॐकारेश्वर* क्षेत्री प्रयाण केले. तेथेच भक्तीसाधनेत चित्त लावून अखेरीस त्यांनी देह विसर्जन केले

 

रेल्वेलाही उभे रहाणे भाग पाडले:

 

        अमरावतीच्या चांदूर (रेल्वे) जवळील दिघी या गांवी श्री बाबांची तान्हाबाई नावाची प्रेमळ भक्त रहात असे. एकदा तिने आपल्या गांवी श्री बाबांना आणून मोठा सोहळा साजरा केला. कार्यक्रम संपवून श्री बाबा बैलगाडीने मालखेड रेल्वे स्टेशन कडे येत होते. पाऊस पाण्याने बैलगाडी योग्य वेळी स्टेशनवर येऊ शकली नाही, इकडे नियोजीत वेळी रेल्वे येऊन सुटण्याची वेळ झाली. पुढे आलेल्या भक्तांनी विनंती करुन थोडावेळ गाड़ी थांबविण्यास स्टेशनमास्तरांना सांगितले. त्यांनी ते ऐकून गार्डला सांगुनही गार्ड ऐकताच हिरवा कंदील दाखवुन गाडी सोडण्याची ड्रायव्हरला खुण केली. त्याप्रमाणे गाडी सुरु करण्यासाठी नेहमीप्रमाणे प्रयत्न करूनही गाडी शुरुच होईना, बराच वेळ खटाटोप चालविला. तेवढ्यात श्री बाबा भक्तांसह येऊन गाडीत बसले, त्यांचे पाऊल गाडीत पडताच अचानकपणेच गाडी सुरु होऊन पुढे धावू लागली. त्यामुळे गार्ड, ड्रायव्हर सर्वप्रवाशी चकित झाले पुढील बड़नेरा स्टेशनवर चक्क तासभर यासर्वांचीच श्री बाबांच्या दर्शनासाठी रांग लागली होती. मांजरखेड (दानापूर) चे पुंडलीकराव गावंडे या प्रसंगाचे साक्षी आहेत.

 

संत लहानुजींचा अंतरीक जिव्हाळा

 

        वरखेडच्या प्रख्यात अवलिया श्री आडकोजींच्या परमकृपेनेच योगीराज श्री लहानुजी महाराज पूर्णत्वास पोचले. श्री कडू यांच्या गोठयात बसून भिंतीकडे तोंड करूनच ते आलेल्या भक्तांना दर्शन मार्गदर्शन करीत, भरदुपारी सूर्याकडे एकटक पहात त्राटक करण्याची त्यांची तयारी होती. एकदा त्यांनीच श्री कडूना सांगून गोरेगांवहून श्री बाबांना मुद्दामहून आपल्याकडे टाकरखेड (वर्धा) ला आणविले होते. त्यांचे परस्पर अंतर्गत दृढप्रेम होते, ते श्री बाबांविषयी नेहमी म्हणत, *श्री पुंडलिक बाबा हे संतामधले युवराज आहेत* वर्धा येथे रहाणारे श्री. दामोधर मिठे यांचा मुलगा जन्मत: अवलिया वृत्तीचा होता. त्याबाबत त्यांना चिंता असल्याने त्यांनी श्रीसंत लहानुजीकडे त्यास नेले तेव्हा त्यांनी, *अरे हा आमच्यातीलच आहे. खरा साधू आहे* असे सांगितले तरीही पुढे श्री मिठे त्या मुलास घेऊन श्री बाबांच्या दर्शनास आले. त्यावेळी त्यांचा प्रश्न ओळखून श्री बाबा म्हणाले, *संत लहानुजी काय म्हणे बा? परत काहून विचारता?* यातुन सर्व संताचे अंतर्यामी एकत्व कसे दृढ असते ते स्पष्ट दिसून येते.

 

शेगांवचे गजानन तेही रूप माझे

 

         श्री बाबा गोरेगावी असतांना श्री प्रल्हाद परशराम गिरी हे त्यांची मनापासून सेवा करीत असत, सेवेत असतांनाच एकदा श्री गिरींच्या मनात असा विचार आला, *आपले श्री पुंडलिक बाबा तर देव खरे पण श्री गजाननबाबांचेच अवतार नसतील काय ?* त्याचवेळी त्यांना श्री पुंडलिक बाबांच्या ठिकाणी शेगावचे श्री गजानन बाबांचे परममंगल दर्शन घडले.

         शेगांव येथेही पूर्वीच श्री बाबांचे स्वागत श्रीं गजानन रुप समजून झाले होते. सन १९७८ मध्ये श्री गजानन बाबांच्या शंभराव्या प्रगटदिन सोहळ्यासही श्री बाबा शेगावी आनंदाने हजर होते. *श्री पुरुषोत्तम भाऊ पाटील, श्री शिवशंकरभाऊ पाटील* ही शेगांव संस्थानची परम गजानन भक्त विश्वस्त मंडळी *श्री बाबांच्या* चरणी श्रद्धेने लीन असत. अकोल्याच्या कु. लताताई आसरे या सद्भक्ती करणाऱ्या साधिकेसही *शेगांवचे श्री गजानन बाबा श्री पुज्य पुंडलिकबाबा* एकच असल्याचे दृष्टांताने समजले होते.

 

गरीबांचा वाली श्री पुंडलिक देव
 

       एकदा गोरेगांवहून एका भक्ताच्या आग्रहामुळे त्याच्या नविन गाडीने श्री बाबा अकोल्याकडे निघाले होते. वाटेत डोंगरगांवला अचानक गाडी बंद पडली. नविन गाडी कोणतीही तक्रार नसताना बंद पडल्यामूळे भक्त ड्रायव्हर चकित होऊन नादुरुस्तीचे कारण शोधू लागले. त्याचदरम्यान एक गरीब दांपत्य आपल्या आजारी मुलाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी गाडीची वाट पहात उभे होते. गाडी बंद पडताच श्री बाबा गाडीतून बाहेर आले. त्यांचे ते कफनीधारी रुप पाहन ते दांपत्य श्रद्धेने येऊन त्यांचे दर्शन घेऊ लागले. माता आपला आजारी मुलगा भीमराव याच्या तब्बेतीसाठी श्री बाबांना प्रार्थू लागली. श्री बाबा तेव्हा त्या मातेस म्हणाले, *मा बाई मले चटणी भाकर दे नां* आपल्या गोठोड्यातील पदार्थ ओळखलेले पाहून त्यामातेने आनंदाने चटणीभाकरी देऊ केली. डोळ्यांतून पाण्याची धार लागूनही त्या गरीबांची ती कोरडी भाकरी झणझणीत चटणी तशीच प्रेमाने खात श्री बाबा तृप्त झाले. नंतर त्या मुलास पुदिन्याचा रस देण्यास सांगून घरी जाण्याची आज्ञा केली. ते कुटूबही श्रद्धेने दवाखान्याचा विचार सोडून घरी गेले. त्याच दरम्यान ती गाडीही आपोआपच सुरु झाली. एकंदरीत श्री बाबांचीच ही एक लीला होती. पुढे मुलगा बरा झाल्यावर ते गरीब कुटूंब कृतज्ञभावाने गोरेगावी दर्शनास येऊन गेले.

भक्तप्रतिपालक श्री बाबा:
 

वरुड शेंदूरजनाचे रहिवासी श्री भानुदास मुरलीधर पाठक हे प्रथम भगवान श्री मुंगसाजीचे भक्त असून मुंगसाजी देव मुंबईला गेल्यापासून श्री पुंडलिकदेवाकडे त्यांचे येणे सुर झाले. पुढे तर श्रद्धेने ते कायमचेच सेवाधारी रुपा श्री बाबांच्या जवळ राहू लागले. गोरेगावी एकदा स्टोव्ह पेटवित असतांना ते अग्निच्या तावडीत सापडले. तेव्हा श्री बाबांच्या कृपेनेच त्यांची सुटका होऊन ते सही सलामत बचावले. गोरेगांव नंतर मुर्तिजापूरी पुंडलिक नगरात श्री बाबांच्या सेवेत ते आले अद्यापि श्री बाबांच्या महासमाधी नंतर ही ते तिथेच भरी सेवेत मग्न आहेत.

 

रामकृष्ण मुळे हे ही गोरेगांवपासूनच श्री बाबांचे सेवाधारी बनून राहिले. श्री बाबांच्या शब्दानुरुप त्यांनी निष्ठेने सेवा केली. पूढे श्री बाबांच्या आद्येनेच श्री शामराव पाटील यांनी त्यांना मुलगा समजून शेती घर देऊ केले. त्यांचे लग्नही श्री बाबांच्या कृपेने जमले पत्रिकेनुसार नववधू अल्पायुषी असूनही श्री बाबांच्या शब्दावर हुकुमाने तिला बारावर्षाचे आयुष्य लाभले, लग्नप्रसंगी श्री बाबा सह इतर विदेही महात्म्ये धरुन बारा थोर संतांची मांदियाळीच जमली होती श्री बाबांच्या इच्छेने त्यानंतर त्यांच्या दुसरा विवाह ही घडून आला भक्तीसेवेसह प्रपंचही सुखाने चालला.

 

अकोल्यातील आजच्या राऊतवाडी मधील श्री बाबांच्या सुप्रसिद्ध मंदिराचे निर्माते श्री राघोजी महाराज हे ही गोरेगांवी श्री बाबा असल्यापासूनच त्यांच्या दर्शनास येत असत. पुढे आपल्या घरीच नित्यनियमाने ते श्री भगवान मुंगसाजी श्री बाबांची आरती ठराविक वेळ जराही चुकविता श्रद्धेने करू लागले. त्या आरतीच्या समयी बासरीचे मधुरध्वनी आपो आपच कानी पडत. हळूहळू अनेक भाविकही येथे जमून भक्तीसेवेत रमू लागले. श्री राघोजी महाराज मार्गदर्शन करून भक्तीप्रसार करण्यात गुंगले. श्री बाबांच्या उत्सव समयी पालखी घेऊन दिंडीने ते पुंडलिक नगरी येत. तसेच आपल्या मंदिरीही नित्याप्रमाणेच वार्षिक उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा करीतते अद्यापी सेवारत आहेत.

 

पापळ गांवातील चांभार जमातीतील प्रभुदास नावाचा लहान मुलगा गोरेगांवलाच श्री बाबांच्या दरबारी राहून सेवाबुद्धीने यथाशक्य कामे करीत राही. एकदा त्याच्या कामाविषयी तक्रार करीत श्री राधाकिसनबुवांनी त्यास शिक्षा केली. तेव्हा रडत येवून श्री बाबांना तो त्या बाबत सांगू लागला. ते ऐकून श्री बाबा त्यास म्हणाले, "साधू होऊन ये ना भाऊ" गंमत म्हणजे त्यानंतर त्याला वाचासिद्धी लाभून लोक त्याला साधू मानू लागले. मूर्तिजापूरच्या सिरसोला त्यांचे ठिकाण होते. श्री जनार्दन इंगळेच्या घरी त्यांचे जाणे येणे असे. श्री बाबा धांडे यांना आधीच सांगितल्या प्रमाणे सन १९९० मध्ये देह सोडला.

 

श्री बाबांच्या ठिकाणी कोणताही उच्चनीच, भाषा, प्रांत, जातीजमाती, धर्मपंथ, संप्रदाय या पैकी कुठल्याच गोष्टींचा भेदभाव नसल्याने, सर्व थरातल्या लोकांचा त्यांच्या भक्त परिवारात समावेश असल्याचे प्रथम पासूनच दिसून येई. गाझीपूरचे मुसा पाटील, सांगळूदचे करीमभाई या सारखे मुस्लिम ही निर्मळ मनाने त्यांचे चरणी वंदन करीत. शेलवाड़ी येथिल फरीद फकीर तर आपला महारोग श्री बाबांनीच बरा केला या श्रद्धेने नियमित वारीस येई. फैयादबाबा नावाचे एक भक्तही सर्वजनपरिचित आहेत.

 

गोरगांवी येणाऱ्या भक्तांच्या प्रेमाखातर श्री बाबाही अधून मधून त्यांच्या वेगवेगळ्या भक्तांच्या गावी जाऊन त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देत असत. त्यानुसार अनेक स्थळी त्यांचे दर्शनसोहळे घडु लागले. यवतमाळ जवळील तरनोळी, कारंजा बहिरम, रामटेक, कुही, पुलगांव अशा कितीतरी गांव त्यांचे भव्य यात्रा सोहळे संपन्न झाले.

 

महिमा तीर्थअंगाऱ्याचा:

 

श्री बनारसे आजीबाईचा एक नातेवाईक लंडनला रहात असे. त्यांस अल्सरचा असह्य त्रास होऊ लागला, अमरावती जवळील गणोजा गांवच्या गुल्हानेची मुलगी ही त्यांची धर्मपत्नी मुळातच सश्रद्ध होती. ती गोरेगांवी येऊन ते श्री बाबाचेदर्शन घेऊन त्यांचे तीर्थ भाविकतेने बाटलीत भरून लंडनला घेऊन गेली. तिथे श्रद्धेने पती त्यांचा अल्सर नाहीसा झाला. तेव्हा तेथील डॉक्टरनी चकीत होऊन तीर्थाचे पाणी प्रयोग शाळेत तपासून पाहिले तर त्याना त्यात काहीच औषधी आढले नाही.

 

अशाप्रकारेच अनेक भाविकांना श्री बाबांच्या अंगाऱ्याने तीर्थाने प्रसंगी नुसत्या शब्दानेच रोगनिर्मुलन झाल्याचा प्रत्यय येई नागपूरच्या रामदास पेठेतील गंगा शेट्टीवार, मुर्तिजापूरच्या श्री विश्वनाथ मुळेंचे सुपुत्र प्रा. दिपक मुळे, मुर्तिजापूरच्या श्रीकृष्ण गणेशे गुरुजीचा मुलगा श्रीकांत या सारख्या काही जणांची ठरलेली तातडीची ऑपरेशनने श्री बाबांच्या कृपेने स्थगीत होऊनही आरोग्यलाभ झाला. चांदूर जवळील एरडच्या श्री गणपतराव बावणेंचा दीड वर्षाचा मुलगा राजेन्द्र मरणोन्मुख अवस्थेत ठीक झाला.बग्गी जावरा येथील श्री अंबादास चौकडे यांचा मुलगा विजय जन्मतःच लंगडत असूनही पाच वर्षानंतर श्री बाबांच्या भेटीमुळे व्यवस्थित चालु लागाला मूर्तिजापूर जवळील खिनखिनिच्या श्री आनंदराव नंदेश्वर यांच्या पत्नी देवकाबाई, जळगांवच्या तोंडापूरचे श्री रामचंद्र सुपडू आढाव यांच्या मातोश्री भागाबाई, दिलीप रामकृष्ण रत्नपारखी (अकोला मंगरुळनाथ) यांची आई छबुताई अशा सारख्या कित्येकांना श्री बाबांच्या कृपेनेच आजार दूर पळाल्याचे आश्चर्यकारी अनुभव आले आहेत. अमरावतीच्या रजनी बुटेंचा असाध्य कॅन्सरही बरा झाल्याचे त्या स्वतःच सांगतात. अनेक रोगांबरोबरच अनेकांची दुर्व्यसने श्री बाबांच्या कृपेन केवळ तीर्थ-अंगार्याने नाहीशी झाल्याचेही दाखले आहेत.

 

मुर्तिजापूरला पुंडलिकनगरीत शुभागमन :

 

सन १९५९ मध्ये पूज्य श्री बाबांचे गोरेगांवी वास्तव्य असतानांच काटेपुर्णा नदीला महापूर आला. बरीच गुरढोरे पाण्यात सापडून जिकडे-तिकडे पाणीच पाणी होऊन हाहाकार माजला. सौ. मंजुळमातेने तेव्हा श्री बाबांकडे पाहात, "आता काय करावे ?" असा प्रश्न केला. त्यावर "आई आपण मुर्तिजापूरला जाऊ" असे बाबा म्हणाले. लवकरच पूर ओसरला श्री बाबांचे शब्द विसरले गेले. त्यांनतर - वर्षानी परत श्री बाबा म्हणू लागले "गाडगेबाबा काय म्हणत होते बुवा? मुर्तिजापूरला चला ना बुवा." तेव्हा या पुर्वीच संत गाडगेबाबांनी पूज्य श्री बाबांना मुर्तिजापूरला आणण्याविषयी श्री खंडूनानांना आग्रहाने सांगितलेली घटना आठविली. त्यानुसार सौ. मंजूळामातेला विचारून मुर्तिजापूरला जागेचा शोध सुरु झाला.

 

या दरम्यान एकदा श्री बाबांनीच दर्यापूर रोड वरील शिवराम चांभाराचे शेत विकाऊ असल्याबद्दल सांगितले. त्याप्रमाणे चौकशी करता खरोखरीच तसे आढळले. त्या शेजारीच मुर्तिजापूरच्या दत्त मंदिरातील श्री तुळशीरामजी दिक्षीत यांचेही शेत विकाऊ असल्याचे समजले. मग त्या दोघांशी योग्य बोलणी होऊन सन १९६४ मध्ये ते शेत खरेदी केले गेले. पण श्री बाबांना गाव सोडून इतरत्र नेण्यास गावकर्यांचा विरोध कुटंबियाकडे पुरेसे धन नाही या सबबीमुळें काहीच प्रगती घडेना. अखेरिस श्री बाबांच्या कृपेनेच या बदल घडून भाविकांनी स्वत:कडून सक्रिय सहाय्य करण्यात सुरुवात केली. त्यानुसार रहाण्यासाठी जागा यात्रेकरुंच्या सोयीसाठी पाण्याची मोठी टाकी बांधली गेली. हे काम पुर्ण होताच १६ मार्च १९७२ मधील गुढीपाडव्याच्या शुभदिनी पूज्य श्री बाबांचे येथे राहण्यासाठी शुभागमन घडले. त्याच दिवसापासून पूज्य श्री बाबांच्या ४० व्या जन्मोत्सवाचा प्रारंभही मोठ्या थाटाने सुरू झाला. चैत्र शुद्ध पंचमीला येथील पहिलीच भव्ययात्रा भाविकांच्या गर्दीने फुलून गेली. यावेळी अनेक थोर विदेही सांधूच्या उपस्थिती मध्ये यवतमाळ जवळील धनज (माणिकवाड) येथील महान अवलिया संत श्री नामदेव बाबा यांचाही सहभाग विशेष महत्त्वाचा ठरला. मूर्तिजापूर च्या दर्यापूर रोड वरील सिरसो विभागातील हे ठिकाण आज श्री पुंडलिक नगर म्हणून सुविख्यात झाले आहे.

 

अवलिया संत महंत वंदिती श्री पुंडलिक भगवंत:

 

अगदी बालवयापासून जन्मतःच सिद्धावस्थेत प्रगटलेल्या पूज्य श्री बाबांचे महिमान वेगवेगळ्या सिद्धासाधूनी स्पश्टपणेच सर्वासमोर सांगण्यास सुरुवात केली होती. अगदी प्रथम पिंपळोद चे महान अवलिया श्री परशराम बाबानी हा माझा आत्माच आहे असे उद्गार काढून त्यांचे विषयीचा आपला भाव प्रकट केला होता. अनेक संताची त्यांचे बद्द्लची प्रीती या आधी प्रसंगानुरूप वर्णिली गेली आहेच. त्या शिवाय काही संतान्मध्ये लोधीखेडा येथील संल श्री देवमण महाराज श्री बाबांविषयी म्हणत, "अरे देव पहायचा असेल तर श्री पुंडलिक बाबांकडे जा. ते साक्षात देवच आहेत.”  याची शंभरी ओलांडूनही निरोगी असणार्या दिर्घायूषी योगीराज संत श्री सितारामदास महाराजांचे (मंडाले - . प्र.) म्हणणे होते. "श्री पुंडलिक बाबा साधारण संत नाहीत.जन्मोजन्मीच्या तप:श्चर्येने अशी स्थिती प्राप्त होत असते. असे संत अडळपदी असतात मानवाचे कल्याणासाठी ते स्वेच्छेने मृत्यूलोकात अवतार घेतात. त्यांचे कार्य अगम्य अत्कर्य असते." अकोल्याच्या शिवाजीनगर मधील सुप्रसिद्ध विदेही संत श्री अनंत महाराजांचे श्री बाबांवर भारी प्रेम, गोरेगांव, मुर्तिजापूरी तसेच इतरही अनेक ठिकाणी त्यांची श्री बाबांसमवेत प्रेमभेट बर्याच वेळी घडे. त्यांचे कडे दर्शनाला आलेल्या भाविकांना "गोरेगांवचे पुंडलिकबाबा पाहिले काय ?" असा नित्याचा प्रश्न करुन ते आपला प्रेमभाव नेहमीच व्यक्त करताना दिसून येतात. श्री बाबांच्या महासमाधी सोहळ्यातही त्यांची उपस्थिती त्यांचे बाबांबद्दलचे नाते स्पष्ट करुन जाते. त्यांच्या अंतर्गत भेटीचा प्रत्यय अनेकांना वेळोवेळी येत असे. एकदा हे श्री अनंत महाराज आपल्या आत्याबाई बरोबर नागपूरकडे चालले असतांना त्यांना अकोल्योचे सद्भक्त श्री देवीसींग बैस भेटले. आत्यांनी श्री देवीसींगना कोठे चाललात ? असे विचारल्यावर त्यांनी गोरेगांवी श्री पुंडलिकबाबां कडे जात असल्याचे सांगितले. तेव्हा श्री अनंतमहाराज श्री देवीसींगना म्हणू लागले, "पुंडलिक बाबांना आमचा राम-राम सांगा" श्री देवीसींग गोरेगांवी येऊन श्री पुंडलिक बाबांच्या दरबारी हजर होताच श्री पुंडलिक बाबा त्यांचेकडे पहात प्रसन्न मुद्रेने बोलु लागले, "अनंताचा राम-राम मिळाला बुवा."

 

डव्हा येथील सुप्रसिद्ध श्रीनाथ नंगेमहाराज यांच्या गादीवरील थोर सत्पुरुष श्री बिदुडेदास उर्फ विश्वनाथ महाराज यांचेही श्री पुंडलिकबाबांवर अलोट प्रेम होते. सन १९५१ मध्ये त्यांनी श्री बाबांना डव्हा येथील श्रीनाथ नंगेमहाराजांच्या पवित्र समाधी परिसरात अभ्यंग स्नान घालुन कफनी, पुष्पहार समर्पून यथासांग पूजन केले तेव्हापासून तेथील यात्रा महोत्सवाचा प्रारंभ झाला.

 

मधापुरीचे पूज्य अवलिया संत परमहंस श्री लहरी बाबा यांची पूर्ण कृपा लाभलेले सध्या पूर्णविदेहावस्थेत वावरणारे दहीगांवचे श्री संत सुखदेवबाबा यांची श्री पुंडलिकबाबांवरील गूढगंभीर प्रीती मोठी हदयगंम आहे. वरवर वेड्याचे सोंग पांघरणाऱ्या या विदेही संतव्दयामध्ये श्री पुंडलिक बाबांची मूर्ती अत्यंत शांत, सौम्य भासते तर श्री सुखदेव बाबांचा अवतार साक्षात भोळ्याशंकराचे तृतीय नेत्र उघडून चाललेल्या तांडवनृत्यातील रौद्ररूपाची आठवण देणारा वाटतो. पण हेच श्री सुखदेवबाबा श्री पुंडलिकबाबांच्या दरबारी अगदी गंभीर मुद्रेने येऊन घंटानाद करून श्री बाबाच्या पलंगावर डोके ठेवून नतमस्तक होतात. श्री बाबांचा उल्लेख साहेब या सबोधनाने करतात. श्री बाबांचे पवित्र बूट वगेरे वस्तु प्रतिमा कोणाच्या घरी पाहिल्यातर ते त्या भक्तांस त्यांची यथायोग्य जोपासना पूजाअर्चा करण्याचा सल्ला देताना सांगतात, " बुढा मोठा गरम आहे बर "  परभणी जवळील हिंगोली' चा शक्तीब्रम्हाश्रम सांप्रदायिकांचे आजचे एक प्रमुख केंद्रस्थान बनलेले आहे. येथील समाधिस्त थोर सत्पुरुष श्री नारायण महाराज या श्री पुंडलिक बाबांची अंतररिक अवस्था जाणून आवर्जून प्रेमभेट घेतली होती. श्री नारायण महारांजाच्या समाधीनंतर त्यांचे आधिकारी शिष्य श्री पुरुषोत्तम महाराज हे ही ख्यामनाम संत होऊन गेले.

 

साकोरीच्या सती श्री गोदावरी माताजींची भेट :

 

शिर्डीचे जगप्रसिद्ध संत श्री साईबाबा यांचे अधिकार संपन्न सत्शिश्य श्री उपासनीबाबा यांनी शिर्डी नजिक साकोरी येथे सात्विक महिलांना वेदध्ययन करविणारा श्री कन्याकुमारी आश्रम स्थापला. त्यांचे महासमाधी नंतर आश्रमाचे संचालन त्यांच्याच उत्तराधिकारी सत्शिष्या पूज्य श्री सतीगोदावरी माताजी करू लागल्या. एकदा याच पूज्य श्री माताजी आपल्याकाही शिष्य भक्तमंडळी सह लोणावळा येथे आल्या होत्या. तेथील मुक्कामाच्या स्थळी त्यांच्या सोबतच्या शिष्या श्री माधवीदेवीनी शेगांवच्या 'श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करुन श्री गजानन महाराजाना बेसन भाकरीचा नैवेद्य समर्पण केला. दरम्यान पूज्य श्री पुंडलिकबाबांचे तेथे आगमन घडल्याचे ऐकून श्री माताजी त्यांचे दर्शनासाठी जाऊन त्यांना आपल्या मुक्काम घेऊन आल्या. तेव्हा पूज्य श्री बाबा पूज्य श्री माताजींच्या मांडीवर बसून जेवावयास मागू लागले. त्यावेळी श्री गजानन महाराजांना समर्पण केलेला नैवेद्य स्विकारण्यासाठी तेच या रुपात आलेत असे म्हणत देवाजवळील बेसन भाकरीचा नैवेद्य त्या प्रेमाने श्री बाबांना भरवू लागल्या. सोबतच्या सर्व मंडळींना या संत भेटीने अपूर्व आनंद झाला.

 

श्री गणोरे महाराजांच्या आश्रम निर्मितीला आशिर्वाद

 

पुण्या जवळील भूकूम येथील हरिनाम आश्रम मठाचे संस्थापक पूज्य श्री रामचंद्र गणोरे महाराज हे संत तुकारामांचा दृष्टांतमंत्र मिळवलेले अधिकारी सत्पुरुष. ते एकदा वर्हाडात शिष्याकडे आलेले असताना,गोरेगावी पूज्य श्री बाबांच्या दर्शनासाठी गेले. तेव्हा श्री बाबांनी, "तुमचा आश्रम होता ना, भाऊ.” असे म्हणून त्याच्या आश्रमनिर्मितीच्या कार्याला आपला आशिर्वाद दिला. त्या करिता अन्नदान करण्यासही सुचविले. त्या नंतर फारच गतीने त्यांचे आश्रमाचे कार्य संपूर्ण झाले. त्या दरम्यान श्री बाबांनी सुचविलेला अन्नदानाचा संकल्प त्यांना पुनःश्च दृष्टांताने आठवला. त्या प्रमाणे आपल्या धर्मपत्नी सौ. सीतामाई वगैरे सह मुर्तिजापूरला पुंडलिक नगर मध्ये येवून श्री बाबांची यथासांग पूजा करुन बोलल्या प्रमाणे दोन पोत्याचे अन्नदान करुन श्री गणोरे महाराजांनी श्री बाबांना आश्रमात येण्याविषयी प्रार्थना केली. तेव्हा आपल्या हयातीत येऊ असे बाबा बोलले. त्यानुसार सन १९७६ मध्ये त्याचे या आश्रमात शुभागमन घडले. श्री बाबांची आदराने पुजाअर्चा केली गेली. त्या प्रसंगी काढलेले फोटो आजही आश्रमाच्या हॉलमध्ये लावलेले दिसून येतात. पुढे लवकरच सन १९७८ मध्ये श्री गणोरे महाराजांनी देह विसर्जन केले. आज आश्रम परिसरात त्यांनी उभारलेल्या सुबक क्रमवार देव संताच्या मंदिराबरोबर त्यांचे समाधीस्थानही दर्शनीय स्थल बनले आहे. त्यांनी लिहिलेले ' हा गुरु' हे पुस्तक अनेकांना उपयुक्त ठरले असुन त्यांच्या पश्चात त्यांच्या अधिकारीपत्नी पूज्य श्री सीतामाई गणोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन जिज्ञासूना घडते आहे.


सालबर्डीच्या श्री मारोती महाराजांचे प्रेमः


सालबर्डी या क्षेत्री भव्य धर्मशाळा सदावर्त बांधून भाविकांची सोय करणारे महान संत श्री मारोती महाराज यांचे श्रीबाबांवर विलक्षण प्रेम. त्यांच्या अनेकदा गाठीभेटी घडल्या. सन १९७४ मध्ये नागपूरमधील कार्यक्रमानंतर पूज्य श्री पुंडलीक बाबा सद्भक्त श्री रामकृष्ण नारायण कडू यांच्या लहान बंधूच्या घरी आले होते. श्री बाबा त्यांचे घरी पलंगावर झोपले असतांना श्री मारोती महाराज तेथे येवुन श्री बाबांचे पाय स्वत:चे हाताने मस्तकी चोळुन घेऊ लागले. नंतर कडु परिवाराकडे पहात ते सांगू लागले, "पोरी हो, श्री पुंडलिक बाबांची एखादी जुनी कफनी घरी ठेवत जा. ती फार मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा," पुढ़े देहविसर्जना आधीही श्री संत मारोती महाराजनी आपणाला श्री बाबांच्या दर्शनाला नेण्याची इच्छा बोलून दाखविल्याप्रमाणे श्री कडू वगेरे भक्तान्नि त्यांना झोळी करुन पुंडलिक नगरला आणले. त्या वेळी त्यानंनी वयाची नाव्वदी ओलांडून शंभरीकडे वाटचाल सुरु केली होती. श्री बाबांच्या दर्शनानंतर परतल्यानंतर १५ दिवसानीच त्यांनी देह विसर्जन केला.

 

सालबर्डी महायज्ञ प्रसंगी श्री बाबांची अग्रपूजा:

 

सन १९३५ मध्ये सालबर्डीला राष्ट्रसंत श्री तुकडोजीनी भव्य विश्वशांती महायज्ञ प्रसंगी श्री मुंगसाजी महाराजांची प्रमुख अग्रपुजा केली होती. त्यानंतर झालेल्या येथील दुसऱ्या भव्य यज्ञसमारोह प्रसंगी परमहंस आडकोजीचे आधिकारी शिष्य पूज्य संत श्री सत्यदेवबाबा नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुर श्री दादासाहेब काळमेघ यांनी पूज्य श्री बाबांची प्रमुख अग्रपुजा केली. या प्रसंगी नागपूर चे राजे भोसले, लंडनच्या बनारसे आजी इत्यादीनीही आदराने पूजा समर्पूण दर्शन घेतले होते. सत्य देवबाबा श्री बाबांच्या भेटीचा योग अनेकदा जुळून आला होता.

 

संत-नामवंत विचारी, येती पुंडलिका भेटी:

 

दत्तसंप्रदायातील थोर सत्पुरुष ब्र. भू. . . श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामीजींचे अनुग्रहीत इंदोरचे सुप्रसिद्ध संत श्री नाना महाराज तराणेकर श्री बाबां विषयी म्हणत, "परमहंस स्थितीत रममाण असलेले श्री पुंडलिक बाबायांचा अधिकार फार मोठा आहे." त्यांच्या या शब्दांमुळेच एका ब्राम्हणदांपत्त्याच्या मनातील जातीभेद नष्ट होऊन ते श्री बाबांच्या दर्शनास येऊ लागले. नारेश्वराच्या पूज्य श्री रंगावधूत महाराजांचे एक अधिकारी शिष्य तसेच कोल्हापूरच्या जवळील नृसिंहवाडीचे परमदत्तभक्त संत श्री म्हादबा पाटील धुळगांवकर महाराज, खामगांवच्या मुक्तेश्वर आश्रमाचे धर्मभास्कर संत श्री पाचलेगांवकर महाराज, वाकी (बोरगांव मंजू) येथील श्री झाबाजी महाराज या सारख्यांनी श्री बाबांचे दर्शन घेऊन गौरवोद्गारकाढले होते.

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुस्थानी मानून आपल्या प्रज्ञेने लेखन, प्रवचन, प्रबोधन करणार्या संत म्हणून प्रसिद्धी पावलेल्या श्री अच्युत महाराजांना श्री बाबांविषयी फारच आदर असल्याने प्रसंगानुरूप दर्शनाभेटीनंतर ते म्हणतात, "श्री पुंडलिक महाराज ही संतश्रेष्ठ साक्षात्कारी विभूती आहे." नामवंत विचारवंत महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती संत प्रेमी श्री बाळासाहेब भारदे श्री बाबांच्या जन्मोत्सव प्रसंगी राष्ट्रसंतासमवेत गोरेगांवी देने उपस्थित होते. त्यावेळी त्यांचे प्रवचनही झाले होते. ते म्हणतात, " श्री पुंडलिक बाबांसारख्या संताच्या दर्शनाने धन्य झालो. त्यांची स्थिती असाधरण आहे."

 

आपल्या मीनीबसमधून सदासर्वकाळ देवकीनंदन गोपाला' चा नामघोष करीत भ्रमंती करत राहणार्या काटोल (कोलद) टाकरखेडचे भव्य आश्रम स्थापून अनेक चमत्कार कधांमुळे प्रसिद्धी पावलेल्या श्री गुलाब बाबा  प्रत्येक संताविशयीचे विनम्र प्रेम सर्वाच्या कौतुकाचा विषय आहे. श्री बाबांविषयीही त्यांना अलोट प्रेम असुन ते वेळोवेळी त्यांचा जय घोश आपल्या कार्यक्रमातुन आवर्जून करतात. बर्याच वेळा ते अनेक सोबत्यांसह श्री बाबांच्या दर्शनास येत. ते म्हणत "श्री बाबा हे रामाचे अवतार आहेत. केवळ रामच आहेत."  श्री बाबांच्या महासमाधीप्रसंगीही ते हजर होते.

 

नागपूर जवळील नरखेड तालुक्यातील चांदणी बर्डी येथील विद्यमान समाजसेवी संत म्हणुन ख्यातनाम श्री  भाकरे महाराज, हिवरखेड (बुलढाणा) येथे श्री विवेकानंद आश्रम स्थापन औषधोपचार, शिक्षणकार्य करणारे श्री शुकदास महाराज, कोल्हापूरचे नामवंत विचारवंत श्री दत्ताबाळ वगैरे अनेक नामवंत श्री बाबांच्या दर्शनास येऊन गेले आहेत.