श्री पुंडलिक बाबायांचे ब्रम्हनिर्वाण

 


महासमाधीचे संकेत

 

सन १९८५ मध्ये आधिकमास आल्याने मुर्तिजापूरच्या श्री पुंडलिक नगरात श्री बाबांच्या दरबारी श्री नरेंद्र ढोक रामविजय ग्रंथाचे पठन करीत होते. *अधिक मासानिमित्य* आधिकाधिक भाविकांचे जथ्येच्या जथ्थे श्री बाबांच्या दर्शनास येवु लागले. त्याला कारण केवळ अधिक मासाचे नव्हते तर श्री बाबा आता आपले या देहातील अवतार कार्य संपवून निर्गुणरुपात परतणार असल्याचे अनेकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संकेत मिळू लागले होते. आपले दृष्टांत येथे येवून जो तो प्रत्येकास सांगून श्री बाबांच्या विरहाच्या नुसत्या कल्पनेनेच कळवळून जाऊ लागला. सन १९७६ मध्ये असेच त्यांना काही आजाराने अकोल्याच्या डॉ. भागवतांकडे नेले असताना डॉ. भागवतांना श्री बाबांचे कृष्णरुपात दर्शन घडले होते. त्यामुळे भगवान *श्री सत्यसाई बाबांची* मनोभावे उपासना करणाऱ्या डॉ. भागवतांनी संत महात्म्य जाणून यथोचित आदराने योग्य मर्यादा ध्यानी ठेवून त्यांची यथाशक्य सेवा केली. त्यानंतर श्री बाबांना मधुमेह असल्याचे निदान झाल्यामुळे त्यांचे सर्व प्रवास दौरे पूर्णतः बंद केले गेले. तत्पूर्वी विदर्भातील लहान मोठ्या गावापासून ते थेट कोकणापर्यंत शिर्डी, गणेशपुरी वैगरे सारख्या विश्ववंद्य तीर्थस्थळीही श्री बाबांचा नित्य प्रवास दौरा भक्तांच्या आग्रहाने सुरुच असे. भक्तांच्या चित्रविचित्र प्रेमागृहाला श्री बाबांसारखा विदेही कोणतेही बंधन पाळता प्रतिसाद देत त्यांचे शरीराकडे कधीच लक्ष नसे. खाणे - पिणे - झोपणे - जागणे याबाबत कधीच कोणताही निश्चित नसे.

       त्यादिवशी जेवणानंतर सद्भक्त डॉ. बेलखेडकर श्री बाबांना इन्शुलीनचे इंजेक्शन देऊ लागले होते. तेव्हा परत - परत इंजेक्शन नाकारीत श्री बाबा म्हणु लागले होते, *झाल रे आता झालं की, झालं बाप्पा, झालरे*सद्भक्त श्री पांडुरंग मुंदेकर यांना श्री बाबा आपले *सद्गुरु श्री भगवान मुंगसाजीकडे* परवानगी मागत आहेत, असा दृष्टांत झाला, तसेच एकदा श्री बाबा स्वतः भोवती गिरकी घेऊन जोराने फिरत अचानक अदृश्य झाल्याचेही दिसले.

       *नाशवंत देह जाणार सकल* हे पालुपद अलीकडे श्री बाबांच्या तोंडून परत-परत ऐकू येऊ लागले होते. *देह जाणार - जाणार त्यासी काळोबा खाणार* असे श्री बाबा हसतमुखाने अधिकमासात येणाऱ्या भाविकांच्या कानी घातल्याशिवाय रहात नसत. सद्भक्त बाबा धांडेना एकांतात असतांना *तुझ्या बापाचे काम झाले* असे श्री बाबांनी २४ मार्च रोजीच सांगितले होते. धांडे पातुरला नोकरीवर असतांना *अन्नदान लवकर उरकून घेण्याचा* संकेत मिळाला. त्याप्रमाणे ते पावसाळी दिवस असूनही त्यांनी श्री बाबांसमोर आपले अन्नदान कार्य संपन्न केले.

       अकोल्यातील श्री प्रल्हादगिरी टेलर कडे त्यांच्या 'परफेक्ट' नावाच्या दुकानी त्यांनी श्री बाबांची यथासांग पूजा केली. त्यावर त्यांचेकडे पहात श्री बाबा म्हणाले *शेवटचे*,  ऑक्टोबर ८५ ला सद्भक्त बाबा धाडेंच्या पत्नी सौ. शालीनीबाई श्री बाबांच्या दर्शनास आल्या. त्यांनी नित्याप्रमाणे दर्शन घेताच श्री बाबा त्यांस म्हणु लागले,*आम्ही गावाला जातो नां बुवा. टांगा न्यायला आला नां रे*

महासमाधी:

 

ऑक्टोबर ८५ च्या मंगळवारी साऱ्या दिवसभर श्री बाबा पुंडलिकनगरच्या आवारात अविश्रांत फिरू लागले. श्री हिमंतराव देशमुख सहकुटुंब दर्शनास येवून श्री नारायणभाऊंना *देव समाधी घेणार आहेत का ?* असे विचारू लागले. तेव्हा नारायणभाऊंनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे त्यांना सांगितले. तरीही श्री देशमुख *परमहंस देव काय करतील कोणाला ठाऊक ?* असे म्हणु लागले. तसेच कामरगांवचे श्री बंडू देशमुख यांच्या लहान मुलाने त्या दिवशी सकाळी उठताच रडत-रडतच *श्री बाबा समाधी घेणार आहेत* असे त्यांना सांगितले ते ऐकून तेही अंचब्यांने लगेच त्या दिवशीच दर्शनास आले होते.           

      त्यावेळी पूज्य श्रीबाबांची तब्येत खरोखरीच अगदी व्यवस्थित होती नेहमी प्रमाणेच हिंडणे-फिरणे-बोलणे बसणे वगैरे सुरु होते. श्री विश्वनाथराव मुळे त्या दिवशी योगायोगाने संबंध दिवस भर तेथेच होते. त्यांनीही सांगितले की त्या दिवशी श्री बाबा नेहमी पेक्षा जास्तच हिंडत-फिरत होते.

       श्री राधाकिसन बुवा श्रीबाबांचे हे दिवसभराचे हिंडणे पाहून श्रीबाबांना त्याबाबत परत-परत सांगून विश्रांती घेण्यास सांगू लागले. पूर्वीही श्रीबाबांचे हिंडणे पाहून श्रीराधाकिसन बुवा श्रीबाबांना किती हिंडता असे म्हणताच ते म्हणत असत, *श्री राम रानोरान का फिरला बुवा ?* श्रीबाबांचे सदगुरु श्रीमुंगसाजीदेवही असेच वरवर करीत हिंडतांना पाहून श्री सद्भक्त श्री संभा महाराज त्यांना त्याबाबत विचारता म्हणत असत, *मुंगश्या एक पाऊल टाकतो तर एका भक्ताचे संकट नाहीसे होते. तर आता बोल चालू की नको* श्री बाबांचेही अगदी असेच होते. त्यादिवशी बरीच रात्र होऊन सर्वत्र सामसूम झाली तरीही भक्तांच्या सोबतीने श्रीबाबांचे हिंडणे सुरुच होते. ते पाहून श्रीराधाकिसनबुवा श्रीबाबांना परत म्हणाले, *बाबा आता किती फिरता ? जाऊन थोडी झोप घ्यानां देवा* ते ऐकून श्री बाबा म्हणाले,*कायमचेच झोपतो बुवा* नंतर रात्री अकराच्या सुमारास ते आपल्या दरबारी पलंगावर येवून बसत म्हणाले, *थकलो बुवा*

       श्री बाबा पलंगावर पडल्यावर सर्व सेवकगणही झोपी गेले. ऐन त्याच दिवशी मी मौदा जि. नागपूर येथे स्थानिक लोकांना संत दर्शन व्हावे परम् पुज्यनिय श्री बाबांचे चरणकमल माझे घराला लागावेत म्हणून श्री बाबांची अनुमती घेवुनच मोठा दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता, आणी ह्याच कार्यक्रमाला श्रीबाबा तब्येती मुळे येवु शकत नसल्यामुळे श्री नारायणभाऊ मौद्याला जाण्याकरीता रात्री नुकतेच मुर्तिजापुर स्टेशनवर गेले होते. रात्री बाराला श्री बाबा वांती करु लागले. त्या दरम्यान श्री नारायणभाऊंच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई जाग्या असल्याने दरबारात येऊन पाहु लागताच त्यांना श्री बाबा आजारी असल्याचे जाणवले. त्यांनी तेथील भक्तांस श्री. विठ्ठलरावांना उठविले. लगेचच श्री नारायणभाऊंना निरोप देवून बोलावून घेतले. ते परत येताच त्यांनी डॉ. सारडांना फोन केला त्यानुसार डॉ. सारडा जीप काढून येऊ लागले. तर ती नादुरुस्त म्हणुन फियाट गाडी घेऊन येऊ लागले. मध्येच रेल्वे फाटक बंद असल्याने काहीवेळ निराशेने थांबुन फाटक उघडताच त्वरीत पुंडलिक नगरीत येवून पोहोचले. श्री बाबांना तपासू लागताच ते *झाल रे झाल आता* असे म्हणू लागले. डॉ. सारडांना त्यामुळे उपचार करण्यास सुचेना. त्यांनी अकोल्याच्या डॉ. भागवतांना फोन लावण्यास सांगितले. त्याप्रमाणे फोन करताच त्यांनी श्रीबाबांना अकोल्यास घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार गाडीतून श्री बाबाना झोपवून नेवू लागताच श्री बाबा *नाही रे* म्हणु लागले. पण मग भक्तांनी बळजबरीने श्री बाबांच्या प्रकृतीच्या काळजीने मोठ्या दवाखान्यात उपचार करण्याच्या इराद्याने त्यांना तसेच झोपवून, नेवू लागले. डॉ. सारडा स्वतः गाडी चालवित होते. गाडीत श्रीबाबांचे बंधू नारायणराव, विठ्ठलराव परमभक्त सेवक गुलाब मोहोड इतके जणच होते. वाशिंबा जवळ नाईलाजाने गाडी थांबवली त्याचवेळी श्री विठ्ठलरावांच्या मांडीवर मस्तक श्री गुलाबरावांच्या मांडीवर पाय ठेवलेले असतांना श्री बाबांनी देहविसर्जन केला. तशीच भरधाव वेगाने गाडी चालवून अकोल्यात डॉ. भागवतांकडे नेली असतांना, त्यांनी श्री बाबांचेकडे पाहून त्यांना दंडवत प्रणाम करुन श्री बाबांनी महासमाधी घेतल्याचे जाहीर केले.

        अशाप्रकारे ऑक्टोबर १९८५ ला पहाटे 3.30 वाजताच्या ब्रम्हमुहूर्तावर भाद्रपद वद्य दशमी (नारायण दशमी) रोजी श्री बाबांनी आपले भूवरील या अवतारातील सगुण देहातील कार्य पूर्ण करुन निर्गुणरुपे विश्वव्यापी होऊन अनंतकालपर्यत आपले भक्तरक्षण विश्वोद्धाराचे कार्य अदृष्यपणे सुरु केले.

        आज दररोज गावोगांवचे भाविक नित्याप्रमाणेच दर्शनास येत असून समाधीस्थानी श्री बाबांच्या पूर्वीचा शांतीदायी सहवास अनुभवून तृप्त मनाने परतत असतात. श्री बाबाच्या जन्मोत्सवाप्रमाणेच आता भाद्रपद वद्य दशमी ला पुंडलिकनगरामध्ये भव्य यात्रामहोत्सव साजरा होतांना दिसून येतो आहे. आपणही आता श्री बाबांच्या चरणी अखंड दंडवत प्रणाम करुन उच्चस्वराने त्यांचा जयघोष करुन परमपुनित होऊ या |

 

महायात्रा

 

दूरदर्शन,आकाशवाणी वृत्तपत्रांनी श्री बाबांच्या महासमाधीची वार्ता गावोगावी पोहोचवली. तसेच दूरध्वनी, तारांमार्फत अनेक भक्तांना एकमेकांकडून वार्ता समजू लागली. प्रत्येक भाविक मिळेल त्या वाहनाने मुर्तिजापूरी पोहचू लागला. गांवोगावच्या एस.टी. बसेस, खाजगी वाहने, भरभरून येणाऱ्या रेल्वेचे डबे मुर्तिजापुरला रिकामे होऊ लागले. संपूर्ण दिवसभर रात्रीही लोकांच्या झुंडी पुंडलिक नगरकडे धाव घेतांना दिसून येऊ लागल्या. प्रत्येकाच्या डोळ्यातून वहाणारे अश्रु, अबोल झालेली वाणी, विर्दिर्ण झालेले ह्रदय, श्री बाबांचे अखेरचे दर्शन घेऊन विरह व्यथेने आक्रंदून जाणारे मन यांनी सर्वत्र हाहाकार माजला होता.

 

माता मंजुळेच्या वेदनांची गणती कोण करणार ? कोणीच कोणाचे सांत्वन करण्याच्या तयारीत नव्हता. गोठ्यातील गाई - वासरे हंबरून आपलाही भाव भक्तांच्या कानी पोहचवू पहात होती. विलक्षण आश्चर्य म्हणजे पुंडलिक नगरीतील श्रीदुर्गा दिवीच्या डोळ्यातून ही आंसवे टिपकू लागली. पुढे तीन चारदिवस तिचा चेहरा रडून - रडून लाल झाल्या प्रमाणे अनेकांनी पाहिला.

 

दि. १० आक्टोंबर १९८५ गुरुवारी सकाळी आठला पुंडलिक नगरातुन श्रीबाबांची भव्य महायात्रा निघाली. हजारो भाग्यवान फुलांनी सजविला गेलेला तो पुण्यदायी ट्रक लाखो लोकांच्या सोबत सिरसो येथून मुर्तिजापुर नगरील श्रीबाबांना अखेरचे फिरवून परत पुंडलिक नगराकडे आला गावातील कित्येकजण आपल्या जवळच्या या हिन्याला आपण ओळखता दुर्दैवाने करंटेपणे दुरच राहिल्या बद्दल शोक व्यक्त करू लागले. साधारणतः लाखांचा लोक समुदाय त्या वेळी तिथे जमला होता. या पूर्वी कधीच मुर्तिजापुरला इतका अफाट जनसमुदाय जमला नव्हता.

 

श्री बाबांनी अप्रत्यक्षरीत्या सांगितलेल्या जागेवर त्यांच्या समाधी साठी जागा खोदून बांधकाम सुरु झाले. श्री पुंडलिकराव सरोदे ठेकेदार हे काम करतांना पूर्वीची आठवण भारवलेल्या अंत:करणाने सांगू लागले. फार पूर्वी गोरेगांवी बाबा असतांना तिथे श्री बाबांचेसाठी मंदिर बांधण्यासाठी त्यांनी त्यांची परवानगी मागितली. तेव्हा श्री बाबा पुढे बांधाल' असे म्हाणाले, तरीही त्यांनी बांधकामाचे काही साहित्य वाळू विटा वगेरे तेथे आणून टाकले पण काही सुरु झाले नाही नदीच्या महापुरात साहित्य वाहुन गेले, परंतु आता श्री बाबांचेच ते शब्द त्यांच्याकडून हे समाधी ओट्याचे बांधकाम करून घेऊ लागले होते.

 

लाखो भकतांच्या नामघोषाच्या गजरांत असंख्य पुष्पहारांच्या राशीतुन मिरवत - मिरवत श्री बाबांचा पवित्र देह समाधीस्थळी आणला गेला. दहाबाय बारा फूट लांब-रुंद बांधलेल्या त्या भूगर्भ स्थळी यथाविधीवत अभिषिक्त केलेला श्री बाबाचा परमपवित्र देह सुवर्णरत्नाकित नियोजित स्थानी बसविला गेला. सुंगधीपुष्ये तुळशीहार समर्पून बिल्वपत्रे वाहून मंगल आरतीचा ध्वनी सर्वपत्र घूमू लागला. त्यानंतर श्री बाबांच्या जयजयकाराच्या अभूतपूर्व निनादात मिठाच्या सुमारे अडीचशे पोत्यांनी ते स्थान पूर्ण भरून वरून बांधून घेतले गेले. त्यावर श्री बाबांच्या पादुका बसवून त्यांचे सध्या नित्याने पूजन अर्चन सुरु असून सभोवताली भव्य अष्टकोनी गाभारा पुढे भव्य सभामंडप बांधण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर समाधीवर श्री बाबांची सुंदर मूर्तिस्थापुन प्राणप्रतिष्ठा कलशारोहण कार्यक्रम भव्यतेने  घडून आला. आज दररोज गांवोगांवचे भाविक नित्यप्रमाणेच दर्शनास येत असून समाधीस्थानी श्री बाबांच्या पूर्वीचाच शांतिदायी सहवास अनुभवून तृप्त मनाने परतत असतात, श्री बाबांच्या जन्मोत्सवा प्रमाणेच आता भाद्रपद वद्य दशमीला पुंडलिकनगरामधे भव्य यात्रामहोत्सव साजरा होताना दिसुन येतो आहे. आपणही आता श्री बाबांच्या चरणी अखंड दंडवत प्रणाम करून उच्चस्वराने त्यांचा जयघोष करू परमपुनित होऊया, बोला

 

" भगवान परमहंस श्री पुंडलिकबाबा की जय "