श्री पुंडलिक महाराज, मुर्तीजापुर (भाग-८)

 श्री बाबांचे कुटंबीय

 

श्री बाबा तर जन्मत: विश्वकुटुंबी म्हणून प्रगटले तरी ही ज्या पातोंड घराण्यात त्याचें जनन झाले त्या परिवाराबाबत येथे सांगणे जरुरी आहे. श्री बाबांचे पिता श्री खंडुनाना श्री बाबाच्या कृपैने ब्रम्हनिष्ठ होऊन आपल्या जन्माचे सार्थक करुन जानेवारी १९८० मध्ये समाधीस्थ झाले. श्री बाबांच्या आई श्री मंजूळामाता इतक्या मोठ्या ईश्वरी विभूतीची साक्षात जन्मदात्री असूनही आजही सर्वभक्तांच्या मेळाव्यात अगदी सामान्यपणे श्री बाबांची एक भक्त म्हणवून घेऊन पडेल ते काम करण्यात गुंतलेली दिसून येते. श्री बाबांच्या नंतर जन्मलेले चंद्रकला, श्री नारायणभाऊ, विठ्ठलराव, सुभद्रा शांता ही भावंडेही पूज्प श्री बाबांचे महात्म्य जाणून श्रद्धेने त्यांच्या भक्त परिवार बरोबर हसत मुखाने साथ देत आहेत. श्री नारायणभाऊचे सततचे श्री बाबांबरोबर फिरुन भक्तांच्या विविध कार्यात सहभागी होणे शेतीवाडी बरोबर संस्थानाची स्थानिक कामे पहाण्याचे काम श्री विठ्ठलरावांचे हाच क्रम कित्येक वर्षे सुरु असल्याचे दिसते. यांची मुले-मुलीही आपापल्या कुवतीनुसार यात सहभागी होत आल्या आहेत.

 

अतर्क्य महिमा श्रीबाबांचा

 

पूज्य श्री बाबांचे संपूर्ण जीवनातील प्रत्येक क्षण क्षण फारच मोलाचे जगत कल्याणकारी कार्य करताना व्यतीत होत असे. त्यांचे यथार्थ आकलन कधीच कोणी पूर्णतः करु शकेल तर ते अशक्यप्रायच म्हणावे लागेल. त्यांचे सर्वव्यापक समर्थ स्वरूप अनेक प्रसंगी अनुभवास आलेल्या प्रत्यक्ष घटनांनी थोडेफार समजुन येत असे. महाराष्ट्र राज्य लॉटरी सोडत सुरु झाली तेव्हाची एक घटना मोठी मजेशीर आहे. नागपूरच्या सावनेर जवळील श्री घरडे पटवारी यांच्या स्वप्नात जाऊन श्री बाबांनी त्यांना एक लॉटरीचे तिकिट काढण्याची प्रेरणा दिली. त्यानुसार त्यांनी त्यांचे स्मरण करुन एक तिकिट काढले. त्याच तिकिटास दुसऱ्या क्रमांकाचे एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर झाले. ते या प्रकाराने गोरेगांवी येऊन मोठया वैभवी रुपात श्री बाबांची पूजा करून गांवी परतले. त्यांची मुलाखतही तेव्हा दै. तरुणभारत (नागपूर) मधून प्रसिध्द झाली होती.

 

अमरावतीच्या श्री पांडुरंगभाऊ मुंदेकर यांना तर श्री बाबांचे अनेकानेक अतर्क्य अनुभव लाभले आहेत. एकदा ते इतर भक्तांसह पूज्य श्री बाबांना अमरावतीहून कामरगांव मार्गे मुर्तिजापूरला घेऊन येत होते. वाटेत कामरगांव पेट्रोलपंपा जवळ काही वेळ गाडी उभी केली असतांना पूज्यश्री बाबा थोडे बाहेर हिंडून पुढील ड्रायव्हरच्या केबिनकडून गाडीत चढू लागले. गाडीचे ड्रायव्हर चांदूर बाजाराचे श्री वर्मा बाबांना म्हणाले की, " बाबा, आप गाडी चलाते क्या?" तेव्हा त्वरीत श्री बाबा होकार देत बोलले, " आम्ही गाडी चालवतो ना बुवां," नंतर श्री बाबा इतर भक्त मागे पूर्ववत गाडीत बसल्यावर ड्रायव्हर श्री वर्मा ड्रायव्हिंग करू लागताच त्यांना जी गाढ झोप लागली ती थेट हातगांवची हद्द आल्यावरच त्यांची झोप उडाली. हातगांव दिसताच ते गाडी थांबुन पाहु लागताच मनोमन थरारून जाऊन एकदम धसक्याने डोके खाली घालुन सांगू लागले की, "कामरगांवी गाड़ी सुरु करताच मला जी झोप लागली ती आताच उतरली. अशा अवस्थेत ही गाडी सुखरूपपणे येथे आलीच कशी हे समजू शकले नाही."

 

पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नांवे -

 

पूज्यश्री बाबांची महती ओळखून त्यांची यथाशक्य सेवा करण्यासाठी अनेकांची नेहमी तळमळ दिसून येई, काहीजन आपला संसार प्रपंच करतांना वेळ काढून सहभागी होऊ इच्छित तर काहीजण आपला संसार प्रपंच करतांना वेळ काढुन सहभागी होऊ इच्छित तर काहि जन सारसर्वस्व पूज्य श्री बाबा मानुन प्रथम प्राधान्याने त्यांच्या संगतीत राहून सेवेत मग्न होत. पूज्य श्री बाबांच्या जवळ अखंड दिवसरात्र वीणावादन करीत नामस्मरणाचा पहारा देण्याची प्रथा बऱ्याच वर्षांपासून सुरु होती. अनेकजण त्यात सहभागी होत. पुज्य श्री बाबाही आपल्या लहरी नुसार अधुनमधून 'तीणा द्या ना भाऊ' असे म्हणुन वीणा मागून घेत. आपल्या परमपवित्र नाजुक बोटानी विण्याच्या तारा छेडीत मृदुस्वरलहरी निर्माण करून ते भोवतालचे सारे वातावरण प्रसन्न करीत असत,

 

पूज्य श्री बाबाच्या संगतीत राहून त्यांची हर प्रकारे सेवा करणे, अखंड विणा पहारा देणे, आरती पूजा करणे या सारख्या विविध कामात पूज्य श्री बाबाच्या वेळेपासून ते आजतागत अनेकानेक भक्त द्रुड श्रद्धेने सेवारत झालेले दिसून येतात. त्या सर्वांचिच नावे सांगणे मोठे मुश्किल असले तरी प्रतिनिधी रुपात सांगायचे झाले तर श्री माधवराव वंजारीचे सुपुत्र श्री पाडुरंग मुंडे, गंभीरदास भाऊराव साधू, पांडूरंग सरदार गोरेगांवकर, गाझीपूरचे भिवसेनेबुवा, दुर्गावाड्याचे विठोबा थूल, सोनार्याचे नरेश ढोक, कारेगांवचे रामभाऊ चिकटे, मराठवाडा राजनीचे सखारामजी कचरे, खेर्ड्याचे देवराव खंडागळे, वाईचे गुलाबराव गौरखेडे, चिखलीचे हरीभाऊ रायपूरे, लोणी अरबचे मारोतीबुवा, तरनोळीचे मारोतीभाऊ, पारडसिंग्याचे महादेव बोराडे, चांदूर रेल्वे चे पंजाबराव खंडार, अमरावतीचे श्री रामभाऊ अतकरे, अकोल्याच्या जनाबाई गेडाम, मधुकर, प्रल्हादराव, श्री मुर्हादेवी येथील डोंगर कठोऱ्यांची इंदुबाई वाणी कामीनी आजी, दत्तुभाऊ ठाकरे, धामणगांव (देव ) चे श्री पंजाबराव कदम, वटफळीचे किसन राऊत, चिमुरचे कैलासगिरी, मेश्राम गुरुजी, डॉ. अरबट, बाभुळगाव जहागिरचे श्री . कळंब, दर्यापुरचे श्री , ना. ठोकळ अशी अनेक सज्जनांची नामावली घेता येईल.

 

भक्तांची सेवा, यात्रा महोत्सव वगैरे

 

मुर्तिजापूरचे हॉटेल व्यवसाय करणारे प्रेमळसिंधि भक्त श्री हसमतराय मुलचंद राजपाल गेली कित्येक वर्ष पूज्य श्री बाबांच्या चरणी अतीव निष्ठेने येताना दिसतात. यवतमाळच्या श्री निवल घराण्यातील कुटंबीय महिन्यातुन एकदा येवून जातात. धावंडा येथील श्री केशवराव देशमुख हायस्कूलच्या विद्यार्थ्यासह येत. प्रत्येक पौर्णिमिला महत्त्वाच्या प्रसंगी सौ. मैनाबाई गुलाबराव सरोदे यांचे नगरी येणे ठरलेलेच आहे. त्यांच्या कन्या सौ. यमुताई फुले तसेच, कमलबाई नागलकर यांचा दर सोमवारी येण्याचा नियम ठरलेला आहे. पूज्य श्री बाबांचे आगमनदिनही अनेक ठिकाणी मोठ्या उत्सवाने साजरे होतात. तारखेप्रमाणे ऑक्टोबर रोजी श्रींची पुण्यतिथी सद्भक्त श्री इंगळे स्टेशन मास्तर साजरी करतात तर तिथीनुसार अचलपूरच्या टवलार गांवी,पैठणजवळच्या विव्हा मांडवा वगैरे गावोगावी मोठ्या प्रमाणात साजरी होते. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील डेहणी येथे श्री मनोहरराव लालजी राऊत यांचेकडे पूज्य श्री बाबांचे जाणे झाल्यानंतर त्यांची प्रगती झाल्याने दरवर्षी संत्र्याचा पहिला पेटारा श्री बाबांच्या दरबारात अर्पण केल्यावर, बगीच्याची विक्री करण्याच्या त्यांचा नियम आहे. शेगांवजवळील लांजूडचे श्री मधुकर पंढरी ठाकरे यांची श्री बाबा वरील असीम निष्ठा वाखाणण्यासारखी आहे. दर वद्य दशमीस ते श्री बाबांच्या समाधीनंतर येत असतात. पंढरपूर, उज्जैन, बद्रिनाथ वगैरे खूप दूरपर्यंत त्यांनी अनेक भक्तांसोबत श्री बाबांची पालखी नेण्याचा उपक्रम केला असून इतरही तीर्थस्थळी नेण्याची त्यांची इच्छा दिसून येते. त्यांनी लिहिलेले श्री बाबांचे स्तवन प्रकाशित असून ते किर्तनातूनही पुंडलिका सारिखा देव नाही कोठे' असे गर्जून सांगत असतात. बोरी अडगांव येथील श्री बाबांच्या पुण्यतिथी महोत्सव तर लक्षणीयच असतो. संत मंडळीच्या उपस्थितीत भव्य अन्नदान भंडारा येथे संपन्न होतो. श्री बाबांच्या पालखी सोहळ्यात श्री नारायणबुवा मासोतकार भाविकतेने सहभागी होतात.

परमहंस मुंगसाजी महाराज जीवनामृत ग्रंथलेखक कै. तात्यामहाराज उर्फ कृष्णदास खंदहार (शिंगणापूरकर) यांचे नातू श्री गोविददासजी सध्या हिंगणा कारेगांव ता. खामगांव येधे पूज्य श्री पुंडलिक बाबा मंदिर निर्माण केले आहेत. अमरावतीच्या श्री संगेकरांनी संत मालिकेत श्री बाबांची चित्रे प्रसिद्ध करून घरोघरी पोहोचविली.

 

माजी मंत्री कै. श्री पारवेकर यांचे लेकजावई श्री भीमाशंकर गोपाळआप्या धाके (अडगांवकर) हे अमेरिकेत तर श्री संजय दिनकरराव पोटे (अकोटकर) हे थायलंड पॅरिस सारख्या सुंदर परदेशीही पूज्य श्री बाबांची मनोभावे पूजा करून शांतीसुखाचा लाभ मिळवताना दिसून येतात,